वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प अंतर्गत महाराष्ट्रामध्ये आदर्श प्रभागसंघ विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत समुदाय संचलित सनियंत्रीत, स्वायत्त व आर्थिकदृष्ट्या स्वायत्त व शाश्वत प्रशिक्षण संस्था विकसीत करण्यात येत आहेत. याकरिता उमेद अंतर्गत स्थापन झालेल्या नवप्रभा महिला प्रभागसंघ, जेवळी यांच्या माध्यमातून सुरू करण्यात येणाऱ्या समुदाय संचलित प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन ज्ञान प्रबोधिनी हराळी येथे शुक्रवारी (दि. २४) पंचायत समितीचे उपसभापती व्यंकट कोरे व गटविकास अधिकारी सोपान अकेले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा व्यवस्थापक अल्ताफ जिकरे म्हणाले की, महाराष्ट्रात १५ जिल्ह्यात समुदाय संचलित प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात लोहारा तालुक्यातील नवप्रभा महिला प्रभाग संघाच्या माध्यमातून सदरील प्रशिक्षण केंद्र चालविण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले यांनीही महिलांनी विविध प्रशिक्षण घेऊन कौशल्य वाढवून यामधून आपल्या कुटुंबाचा विकास करावा असे आवाहन केले. पंचायत समितीचे उपसभापती व्यंकट कोरे यांनी महिलांच्या अडचणी असल्यास पंचायत समिती लोहारा येथे संपर्क करावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व प्रभागसंघ व ग्रामसंघांचे प्रतिनिधी तसेच जिल्हा व्यवस्थापक अल्ताफ जिकरे, समाधान जोगदंड, ज्ञान प्रबोधिनीच्या श्रुती पाठक, सचिन सुर्यवंशी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदिप चव्हाण यांनी केले तर आभार अलंकार बनसोडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी तालुका अभियान कक्षातील अमोल कासार, प्रणिता कटकदौंड, नरेंद्र गवळी, अविनाश चव्हाण, प्रीतम बनसोडे, शिवशंकर कांबळे, अंतेश्वर माळी व प्रभागातील समुदाय संसाधन व्यक्ती, प्रभागसंघ व्यवस्थापक आदींनी परिश्रम घेतले.