लोहारा प्रतिनिधी –
लोहारा तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. एकूण २२२ जागांसाठी ४९४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून पॅनल तयार करणे, पॅनलमधील उमेदवार व त्यांची कागदपत्रे तयार करणे यासाठी गावपातळीवर पुढाऱ्यांची धावपळ सुरू आहे. गावपातळीवर महत्वाची समजली जाणाऱ्या ग्रामपंचायतीवर आपलेच वर्चस्व असायला हवे यासाठी राजकीय नेते, कार्यकर्त्याकडून मोर्चेबांधणी सुरू असल्याचे चित्र दिसून आले. उमेदवारी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे होते. परंतु दि. २८ पासून सर्व्हर मध्ये अडचण, इंटरनेट स्पीड कमी आदी तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे बुधवारी ( दि.३०) ५.३० पर्यंत व अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करून घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या एकूण २२२ जागांसाठी एकूण ४९४ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काही गावातील उमेदवारांनी एकत्र जल्लोष करत अर्ज दाखल केले. प्राप्त नामनिर्देशन पत्राची छाननी गुरुवारी दि. ३१ डिसेंबरला होणार आहे. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत ४ जानेवारी २०२१ दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि. १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर दि. १८ रोजी मतमोजणी होणार आहे.
तावशीगड ग्रामपंचायत बिनविरोध
तालुक्यातील तावशीगड ग्रामपंचायतीच्या एकूण ११ जागा आहेत. या ११ जागेसाठी ११ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामुळे ही ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्याचे सांगण्यात आले. तालुक्यातील आणखी तीन ते चार ग्रामपंचायती बिनविरोध निघण्याची शक्यता आहे. या ठिकाणी एकूण जागेपेक्षा काही ठिकाणी दोन तर काही ठिकाणी तीन जास्त अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी चित्र स्पष्ट होणार आहे.