वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा नगरपंचायतीच्या उर्वरित ४ जागांसाठी निवडणूक सुरू आहे. या चार जागांसाठी मंगळवारी (दि. १८) मतदान होणार आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार यंत्रणा राबविण्यात येत आहे.
लोहारा नगरपंचायतीच्या एकूण १७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणास स्थगिती दिल्याने राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गाच्या प्रभागाची निवडणूक स्थगित केली. त्यामुळे लोहारा नगरपंचायत निवडणुकीसाठी ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या चार प्रभागाची वगळता उर्वरित १३ प्रभागातील निवडणूक घेण्यात आली. त्यानंतर उर्वरित चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. या चारही ठिकाणी चुरस निर्माण झाली आहे. प्रभाग क्र. ८ मध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सारिका प्रमोद बंगले व काँग्रेसच्या उमेदवार माजी नगराध्यक्षा ज्योती दिपक मुळे यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी या ठिकाणी जोरदार प्रचार सुरू आहे. प्रभाग क्र. १० मध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे अविनाश बळीराम माळी, काँग्रेसकडून विजयकुमार भानुदास ढगे तसेच अपक्ष म्हणून रियाज खडीवाले, कल्याण ढगे, अतिउल्लाखान पठाण यांच्यात लढत होत आहे. प्रभाग क्र. १६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस – शिवसेना आघाडीचे असिफ बागवान तर काँग्रेसकडून आरिफ खानापुरे यांच्यात थेट लढत होत आहे. प्रभाग क्र. १७ मध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या आरती ओम कोरे, काँग्रेसकडून निर्मला शिवलिंगय्या स्वामी तसेच अपक्ष म्हणून देवश्री भरत सुतार, छबन संबय्या स्वामी यांच्यात लढत होत आहे.
या चार जागेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जोरदार प्रचारयंत्रणा राबविण्यात येत आहे. मागील दोन दिवसांपासून प्रत्येक प्रभागातील मतदारांच्या गाठीभेटीसाठी दोन्ही बाजूंच्या राजकीय पक्षाचे नेते शहरात दाखल होत आहेत. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील, युवा नेते किरण गायकवाड, तेली समाज संघटनेचे राज्य युवक उपाध्यक्ष रवी कोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पनुरे, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. १६) मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचार केला. तर काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील, काँग्रेसचे प्रदेश सचिव दिलीप भालेराव, शहराध्यक्ष आयनोद्दीन सवार, पंचायत समिती उमरग्याचे सभापती सचिन पाटील, जि प सदस्य रफिक तांबोळी, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस योगेश राठोड यांनी प्रचार केला.प्रत्येक प्रभागातील उमेदवार मतदारांना मीच कसा योग्य आहे हे पटवून देत आहे. मी प्रभागातील सर्व समस्या दूर करेन, जनतेची सेवा करेन अशी विविध आश्वासने देत आहेत. परंतु सुज्ञ मतदार त्यांचे अमूल्य मतदान कोणाच्या बाजूने देतो हे निकालानंतरच लक्षात येईल. या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. १८) सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.