वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी (दि.१५) वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. यशवंत चंदनशिवे म्हणाले की, डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म अतिशय सामान्य कुटुंबात झाला होता. बालपणी दररोज सकाळी ते लोकांच्या घरी पेपर वाटण्याचे काम करून नंतर शाळेत जायचे. त्यांनाही वाचनाची खूप आवड होती. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य आपल्या राष्ट्रासाठी अर्पण केले आणि शिक्षणाच्या व स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी देशाच्या सर्वोच्च पद म्हणजे राष्ट्रपतीपद भूषविले. त्यांनी अनेक संशोधन केले व रॉकेट , अणुबॉम्ब तयार करून जगामध्ये आपल्या देशाचा दबदबा निर्माण करणारे ते थोर शास्त्रज्ञ होते. त्यामुळेच त्यांची मिसाईल मॅन म्हणून ओळख निर्माण झाली. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा पुरस्कार प्रदान केला. अशा या महान व्यक्तीचा जन्म दिवस हा आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो असे सांगून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी स्कूलमधील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतचे १४५ विद्यार्थी व १५ शिक्षक कर्मचारी यांनी १ तास विविध पुस्तकांचे वाचन केले. यानंतर मुख्याध्यापक शहाजी जाधव यांनी जागतिक “हात धुवा दिन” याची माहिती सांगून आरोग्य विभागाच्या नियमानुसार हात कसे धुवावेत याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. दररोज सर्व विद्यार्थ्यांनी शौचास जावून आल्यानंतर व जेवना अगोदर याप्रकारे स्वच्छ हात धुवावे व स्वच्छतेचे महत्व सांगितले. याप्रसंगी सविता जाधव, संचीता बाचपल्ले, मयुरी नारायणकर, माधवी होगाडे, संतोषी घंटे, सारिका पवार, मीरा माने, शिवानी बिडवे, चांदबी चाऊस, अस्मिता देवकते, सिद्धेश्वर सुरवसे, व्यंकटेश पोतदार, सोमनाथ कुसळकर, प्रेमनाथ राठोड, विजय कांबळे उपस्थित होते.