वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील अचलेर येथील श्रेया शशीकांत सरसंबे हिने दहावीच्या परीक्षेत उत्तुंग असे यश संपादन केले आहे. तिने दहावी बोर्ड परीक्षेमध्ये ९३.६० टक्के गुण मिळवून अचलेरच्या विद्या विकास हायस्कुल या शाळेतून प्रथम क्रमांक मिळवला आहे.
आयुष्य हे काय असते हे तिला अजून माहित सुद्धा नव्हते अशा वेळी दुःखाचा मोठा डोंगर त्यांच्या कुटुंबावर कोसळला होता. घरातील कर्ता पुरुष म्हणजेच श्रेयाचे वडील शशिकांत सरसंबे यांचे निधन झाले होते. घरातील कर्ता पुरुष अचानकपणे निघून गेल्यावर, छत्र हरवल्यानंतर मोठे संकट तिच्या घरावरती आले होते. परंतू तिच्या आईने स्वतःला धीर देत दुःखाचा डोंगर मनामध्ये साठवून ठेवत जिद्दीच्या बळावर श्रेयाला शिकवले व आईचे कष्ट व जिद्द पाहून श्रेयाने परिश्रम घेत इयत्ता दहावी मध्ये ९३.६० टक्के गुण मिळवून संपादन केलेले हे यश कौतुकास्पद आहे.
कै. शशिकांत सरसंबे व त्यांची पत्नी नागिनी सरसंबे या दाम्पत्यांना दोन मुली आहेत. एक मुलगी सध्या बारावी वर्गात शिकत असून दुसरी मुलगी ही श्रेया दहावी उत्तीर्ण झाली आहे. कै. शशिकांत सरसंबे यांना शिक्षणाची खूप आवड होती. शिक्षणाचे महत्त्व त्यांना ज्ञात होते. आपल्या दोन्ही मुलीनी उच्च शिक्षण घेतले पाहिजे असे ते नेहमी स्वप्न बघायचे. म्हणून आपल्या मुलींना ते नेहमी शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यायचे. त्यांचीच प्रेरणा घेऊन श्रेयाने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. जिद्दीच्या बळावर श्रेयाने मिळविलेले यश व तिच्या आईने स्वतःला धीर देत त्यांच्या मुलीसांठी केलेले कष्ट पाहून त्यांच्या या यशाचे अचलेर येथील विद्या विकास हायस्कूल व फिनिक्स फाउंडेशन अचलेर तसेच अचलेर ग्रामस्थासह परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भविष्यात चांगले शिक्षण घेऊन शासकीय अभियंता होण्याची इच्छा श्रेयाने व्यक्त केली आहे.
श्रेया सरसंबे या विदयार्थीनीशी संपर्क साधला असता ती म्हणाली की, माझ्या यशात माझ संपूर्ण परिवार माझे आई – वडील यांनी केलेले कष्ट पाहुन व त्यांची प्रेरणा मला अभ्यासामध्ये प्रोत्साहन वाढवली. मला माझ्या या यशामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. शाळेच्या वेळेव्यतिरिक्त मी दररोज पाच तास अभ्यास करीत होते. जिद्दीने अभ्यासात सातत्य ठेवले. पेपर सोडवण्याचे वेळेचे नियोजन केले. ज्यांनी आम्हाला हे यश मिळविण्यासाठी खऱ्या अर्थाने मार्ग दाखवले व ते सत्यात येण्यासाठी आमच्याकडून अथक परिश्रम करून घेतले ते माझे गुरू फिनिक्स कोचिंग क्लासेस अचलेरचे संस्थापक संचालक जगदीश सुरवसे सर. त्यांनी घेतलेल्या अनेक सराव परीक्षांमुळे मी नियमित व अभ्यासामध्ये सातत्य ठेवले. म्हणूनच मला हे यश मिळवता आले असे मत श्रेयाने व्यक्त केले.