वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
घरातील प्रमुख स्त्री हि त्या कुटुंबातील आरोग्याचा पाया असते. तिचे आरोग्य चांगले असेल तर संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते. त्या कुटुंबात आनंद नांदतो असे प्रतिपादन गटविकास अधिकारी शीतल खिंडे यांनी केले आहे.
माता सुरक्षित तर घर सुरक्षित या तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर नेरूळ व स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि.२८) सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात आयोजित मोफत सर्व रोग निदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूरचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी केले. ते म्हणाले कि “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” या महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या उपक्रमाला प्रतिसाद देत नवरात्र घटस्थापनेपासून या अभियानाची सुरुवात झाली आहे. या अभियानाचा भाग म्हणून तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर नेरूळ व स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूरच्या वतीने हे महा आरोग्य शिबीर आयोजित केले आहे. ग्रामीण भागातील मातांशी, बहिणीशी आपुलकी जोपासत अपुलकीचा धागा आणखी घट्ट करत स्पर्शची वाटचाल सुरु आहे. असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ३० वर्षावरील प्रत्येक व्यक्तीची रक्तदाबाची व मधुमेह यासाठी तपासणी करणे, १८ वर्षावरील महिलांची संपूर्ण आरोग्य तपासणी करणे, क्षयरोग व कुष्ठरोग मोहिमे अंतर्गत जास्तीत जास्त रुग्णाची तपासणी करून उपचार सुरु करून रुग्ण बरा करणे, गरोदर माता तसेच इतर महिलाचा रक्तक्षय कमी करण्यासाठी उपचार करणे शासकीय मोफत योजनांचा जास्तीत जास्त गोरगरीब वंचित व्यक्तींना लाभ देणे या योजनेंतर्गत त्यांच्या मोफत शस्त्रक्रिया करणे इ. महत्वाच्या गोष्टी स्पर्श ग्रामीण रुग्णालयात राबविल्या जात असल्याची माहिती रमाकांत जोशी यांनी यावेळी बोलताना दिली.
या कार्यक्रमासाठी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील, माजी जि. प. सदस्या शितल पाटील, प्रा. डॉ. तुळशीराम उकिरडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्या शीतल पाटील यांनी या सर्व रोग निदान शिबिराची भूमिका स्पष्ट केली. तसेच स्पर्श ग्रामीण रुग्णालय मार्फत दिल्या जात असलेल्या दर्जेदार व तळमळीच्या आरोग्य सेवेबद्दल स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे आभार मानले. यावेळी राहुल पाटील यांनी स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या ग्रामीण आरोग्य सेवेतील योगदानाचे कौतुक केले. स्पर्शमुळे ग्रामीण आरोग्याला बळकटी आली. स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य सेवेमुळे ग्रामीण भागातील अनेक गरीब गरजू वंचीत ग्रामस्थांनी दर्जेदार आरोग्य सेवेचा लाभ झाल्यामुळे त्यांचे आरोग्यमान उंचावले असल्याचे त्यांनी सांगितले.
तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर नेरूळचे प्रा. डॉ. तुळशीराम उकिरडे यांनी तेरणाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराची व करण्यात आलेल्या शस्त्रक्रियांची माहिती दिली. या शिबिरात ७०३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यात ४५५ महिला व २४८ पुरुषांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर नेरूळच्या १२ तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. अच्युत आदटराव यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.