वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, उस्मानाबाद द्वारा दिव्यांगांच्या विशेष शाळा, कर्मशाळा व मतिमंद बालगृहातील दिव्यांग मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे दिनांक २ व ३ डिसेंबर या कालावधीत श्री तुळजाभवानी स्टेडियम व छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, उस्मानाबाद येथे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत ६०० पेक्षा जास्त खेळाडू अस्थिव्यंग, मूकबधिर, मतिमंद व अंध प्रवर्गातून सहभागी झाले होते. सास्तूर निवासी दिव्यांग शाळेतील दिव्यांग खेळाडूंनी आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करीत २१ सुवर्ण, ९ रजत व ८ कांस्य अशी एकूण ३८ पदके जिंकून सलग २० व्या वर्षी क्रीडा स्पर्धेतील जनरल चॅम्पियनशिप पटकावून विक्रम स्थापित केला. प्रशालेतील दिव्यांग खेळाडूंनी आपल्यातील शारीरिक कमतरतेवर मात करीत यश संपादित केले आहे.
आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त दि. २ व ३ डिसेंबर या कालावधीत स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे उदघाटन अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी पी.पी.शिंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी केंद्रे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरणाळे व जिल्हा समाजकल्याण अधिकारी नागनाथ चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दिनांक ३ डिसेंबर २०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, उस्मानाबाद येथे घेण्यात आलेल्या सांस्कृतिक स्पर्धेत प्रशालेतील दिव्यांग कलाकार विद्यार्थ्यांनी ताराराणी यांच्या पराक्रमावर आधारीत ऐतिहासिक नृत्य सादर करून उपस्थित रसिक प्रेक्षकांची मने जिंकत सलग २१ व्या वर्षी या सांस्कृतिक स्पर्धेतील विजेतेपदाला गवसणी घातली. या नृत्यामध्ये ताराराणी यांच्या भूमिकेत कु. अदिती गायकवाड ही विद्यार्थीनी होती. तर संताजी,धनाजीच्या भूमिकेत अलीम चौधरी व सिद्धेश्वर मनाळे या दिव्यांग विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. संध्याराणी कदम, अभिषेक धानूरे, सुर्या शिंदे,भाग्यश्री कांबळे,भाग्येश इस्लामपूरे,किरण खराते,विश्वजीत बिराजदार, महेश पवार,साक्षी नाईक यांनी मावळ्यांच्या भूमिकेत तर प्रशांत कांबळे याने मुघल सरदाराच्या भूमिकेत नृत्यात सहभाग घेतला.
क्रीडा स्पर्धेतील विजयी खेळाडू खालीलप्रमाणे –
——————————————-
अस्थिव्यंग ‘अ’- ८ ते १२ वयोगट मुले- प्रणव अडसूळ -५० मीटर व १०० मीटर धावणे- सुवर्णपदक, अदिती गायकवाड-५० मीटर व १०० मीटर धावणे-सुवर्णपदक, वयोगट-१३ ते १६- भाग्येश इस्लामपूरे-१०० मीटर धावणे-सुवर्णपदक, साक्षी नाईक ५० मीटर व १०० मीटर धावणे-सुवर्णपदक, वयोगट १७ ते २१- रोहित वाघमारे -१०० मीटर धावणे-सुवर्णपदक, मुस्कान बागवान -१०० मीटर व २०० मीटर धावणे- सुवर्णपदक
अस्थिव्यंग ‘ब’ गट- २५ मीटर भरभर चालणे- पृथ्वीराज सुरवसे -सुवर्णपदक, गीताश्री निळे -२५ मीटर भरभर चालणे-सुवर्णपदक, १३ ते १६- अभिषेक धानुरे- ५० मीटर धावणे- सुवर्णपदक
अस्थिव्यंग ‘क’- ८ ते १२ वयोगट- संगीता काळे -२५ मीटर भरभर चालणे-सुवर्णपदक,१३ ते १६ वयोगट- रितेश देशमुख – ५० मीटर व्हीलचेअर रेस व व्हीलचेअर वर बसून सॉफ्टबाॅल थ्रो- सुवर्णपदक, करण माने – ५० मीटर धावणे-सुवर्णपदक, संध्याराणी कदम -५० मीटर धावणे व व्हीलचेअर वर बसून सॉफ्ट बाॅल थ्रो- सुवर्णपदक, राणी मनाळे-५० मीटर व्हीलचेअर रेस-सुवर्णपदक, वयोगट १७ ते २१- राज गायकवाड -१०० मीटर व्हीलचेअर रेस- सुवर्णपदक
जिल्हास्तरीय स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडू आगामी महिन्यात दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने बालेवाडी, पुणे येथे आयोजित करण्यात येत असलेल्या दिव्यांगांच्या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. प्रशालेतील सर्व विजयी खेळाडूंचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी नागनाथ चौगुले, वै.सा.का.भारत कांबळे, सहाय्यक सल्लागार सुभाष शिंदे, श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव निर्मलाताई बदामे, प्रशालेचे मुख्याध्यापक बी.टी.नादरगे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रवीण वाघमोडे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.