वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
स्वच्छ भारत मिशन अतंर्गत मंजूर असलेल्या सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम सुरू न केल्याने दक्षिण जेवळी येथील दोन युवकांनी सोमवारपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. या कामासाठी मुदतवाढ मिळाल्याने हे उपोषण दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि.१८) मागे घेण्यात आले.
तालुक्यातील दक्षिण जेवळी येथील महादेव मंदिराच्या आवारात स्वच्छ भारत मिशन या योजनेतून सार्वजनिक शौचालय मंजूर करण्यात आले आहे. हे काम सुरू करण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी विस्तार अधिकारी यांनी स्थळ पाहणी केली व सहा ऑक्टोबर पासून काम सुरू होईल असे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले होते. मात्र काम सुरू न केल्याने दक्षिण जेवळी येथील युवक नागेश होनाजे, शेतकरी राजेंद्र होनाजे यांनी सोमवार पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. त्यांच्या या उपोषणास युवासेनेचे तालुका उपप्रमुख शिवराज चिनगुंडे, प्रविण बोंदाडे, राम मोरे, वनिता पीचे, संगप्पा मुखे, अशोक भुसाप्पा आदींसह अनेकांनी पाठिंबा दिला होता.
उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि.१८) पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे यांनी या मुदत संपलेल्या स्वच्छतागृहाच्या बांधकामाची मुदत वाढवून दिली असल्याचे सांगितले. त्यामुळे ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत साखरे, ग्रामविकास अधिकारी एम.के. बनशेट्टी यांनीही ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छतागृहाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी पत्र दिल्याने मंगळवारी सायंकाळी उपोषणकर्ते नागेश होनाजे, शेतकरी राजेंद्र होनाजे यांनी हे उपोषण मागे घेतले. यावेळी सरपंच चंद्रकांत साखरे, ग्रामविकास अधिकारी एम.के. बनशेट्टी, शिवराज चिनगुंडे, सतिश उपासे, अप्पू सुरवसे, सत्तेश्वर मुखे उपस्थित होते.