वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरासह तालुक्यात शुक्रवारी (दि.२१) पहाटे जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी असे चित्र निर्माण झाले होते. या पावसामुळे पिकात पाणी थांबून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तालुक्यातील बहुतांश ठिकाणी मागील काही दिवसांत जोरदार पावसाने हजेरी लावली होती. ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तरीही काहीतरी हाताला लागेल या आशेने शेतकरी शेतातील सोयाबीन काढणीच्या कामात व्यस्त होते. काहींनी शेतातील सोयाबीन काढून बनिमी करून शेतात ठेवले होते. शुक्रवारी (दि. २१) पहाटे झालेल्या जोरदार पावसाने या सोयाबीन चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तसेच अनेकांचे सोयाबीन वाहून गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे शेतकऱ्यांवर ऐन दिवाळीच्या तोंडावर मोठे संकट ओढवले आहे. तालुक्यातील बहुतांश ठिकाणी हीच परिस्थिती आहे. भातागळीयेथेही ढगफुटी सदृश पाऊस झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे शेतातील सर्व पिकात पाणी साचले होते. तालुक्यातील सर्वच ठिकाणी जवळपास अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे. शुक्रवारी पहाटे झालेल्या या पावसाने लोहारा शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या पावसाने ओढे नाले प्रवाहित झाले होते.
———-
अनेकांची घरे पडली – घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान
शुक्रवारी पहाटे झालेल्या पावसामुळे लोहारा तालुक्यातील भातागळी येथील जयवंत जगताप, बाबूराव कदम, शिवराम जगताप, शत्रूघ्न फत्तेपुरे, सुका कुलकर्णी यांचे घरे पडले असून सुरेश फत्तेपुरे यांच्या सोयाबीनचेही नुकसान झाले आहे. तसेच श्रीपती समदळे, नागनाथ कारभारी, रामराव जगताप यांच्यासह अनेकांच्या घरात पाणी घूसून संसारोपयोगी वस्तूचे नुकसान झाले. या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाल आहे.