ही इमारत म्हणजे नुसते वसतिगृह न राहता मुलांवर उत्तम संस्कार करणारे गुरुकुल व्हावे असे आवाहन ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट यांनी हराळी येथे बोलताना केले.
तालुक्यातील हराळी येथील ज्ञान प्रबोधिनी केंद्रात मुलांच्या वसतीगृहाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम शुक्रवारी (दि.४) पार पडला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक डॉ. गिरीशराव बापट उपस्थित होते. यावेळी विचार व्यक्त करताना ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी ज्ञान प्रबोधिनीचे ज्येष्ठ सदस्य सुभाषराव देशपांडे, अमोल गांगजी, बसवराज बिराजदार, जयंतराव आठल्ये, अनिल रिसबूड, नंदकुमार कानडे, अनंतराव अभंग यांची प्रमुख उपस्थिती होती. हराळी केंद्राच्या संस्थापिका आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ञ कै. लताताई भिशीकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ या नवीन इमारतीला ‘यशोदा भवन’ हे नाव देण्यात आले आहे. ज्ञान प्रबोधिनी ही संस्था गेली २५ वर्षे या भागातील ग्रामीण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी काम करत आहे. संस्थेच्या शाळेत इ. १ ली ते १० वी पर्यन्तचे सुमारे ३५० विद्यार्थी शिकत आहेत. त्यात बाहेर गावाहून सुमारे १२० विद्यार्थी येथे राहून शिक्षण घेत आहेत. या मुलांच्या निवासाची उत्तम सोय व्हावी आणि त्यांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात नवीन इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले. १० महिन्यांच्या कालावधीत बांधकाम पूर्ण होऊन आता ही इमारत वापरण्यासाठी तयार झाली.

या कार्यक्रमात सुरुवातीला गुरुकुलप्रमुख निखिल कोकाटे यांनी वास्तूपूजन केले आणि सर्व महापुरुषांचे आशीर्वाद इथल्या कामाला लाभावेत अशी प्रार्थना केली. त्यानंतर मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील गीत, पोवाडा आणि नाट्यप्रसंग सादर केला. त्यानंतर इमारतीचे वास्तूविशारद राहुल रावत आणि बांधकाम करणारे वैभव कौलगुड यांचा सत्कार करण्यात आला. विविध सामाजिक कामांच्या पाठीशी उभे राहणारे ज्येष्ठ उद्योजक दादा देशपांडे यांच्या रमा पुरुषोत्तम फाऊंडेशन या संस्थेने या बांधकामासाठी आर्थिक मदत केली आहे. संस्थेचे विश्वस्त हेमाद्री आणि चित्राताई बुझरूक यांचाही सत्कार करण्यात आला. ज्ञान प्रबोधिनी हराळीचे केंद्रप्रमुख अभिजित कापरे यांनी सर्व पाहुण्यांचे आणि कामासाठी सहकार्य केलेल्या सर्व व्यक्तींचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश राजे यांनी केले. यावेळी हराळी केंद्रातील कर्मचारी, ग्रामस्थ व मुलांचे पालक उपस्थित होते.
