लोहारा तालुक्यातील मार्डी जिल्हा परिषद शाळेत बुधवारी (दि.३) जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील दिव्यांग मुलाचा सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील मार्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाळेतील शिक्षक युवराज बनकर यांनी प्रास्ताविक केले. दिव्यांग दिनाचा इतिहास, उद्दिष्टे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. त्यानंतर शिक्षिका महानंदा चव्हाण यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा, अध्यापन पद्धती, शैक्षणिक साहित्य, प्रगतीसाठी आवश्यक असलेली समावेशकतेची भावना त्यांनी स्पष्ट केली. त्यानंतर शाळेतील शिक्षिका वर्षा चौधरी यांनी व्यक्ती वरील सामाजिक दृष्टिकोनावर भाष्य केले. विविध दिव्यांग व्यक्तीने मिळविलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील यशोगाथा सांगितली. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. दिव्यांगासाठी सहानुभूती, सन्मान, समता व संधी देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे असे त्यांनी सांगितले. शालेय समितीचे अध्यक्ष नूर मोहसीन पठाण यांनी वर्षा चौधरी यांच्या अनेक उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण त्यांनी निर्माण केले असे म्हणत त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमात दिव्यांग पण शिक्षण प्रेमी असलेल्या नितीन मानेचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन रमेश खटके यांनी केले. त्यांनी दिव्यांग दिनाच्या उद्देशाबद्दल माहिती सांगून उपस्थितांचा परिचय करून दिला. विनोद कांबळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी शालेय समितीचे सदस्य, शिक्षक प्रेमी नागरिक, महिला उपस्थित होत्या.














