वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाचे एक वेगळे महत्व आहे. या सणाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांनी एकत्र येणे गरजेचे असते. परंतु सध्याचा समाज एकत्रीतपणातुन एकटेपणाकडे जात असल्याने या सणांचा उद्देश साध्य होत नाही. या परिस्थितीत महिलांनी पुढे येऊन एकमेकांच्या सहकार्यातून सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात अग्रभागी रहावे असे आवाहन स्टुडन्ट हेल्पिंग युनिटीच्या अध्यक्षा आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांनी केले.शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या वतीने दि. १२ ते १३ सप्टेंबर या कालावधीत गौरी महालक्ष्मी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे बक्षिस वितरण शनिवारी (दि. २५) लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शामल वडणे या होत्या. स्टुडन्ट हेल्पिंग युनिटीच्या अध्यक्षा आकांक्षा ज्ञानराज चौगुले, गिरीजा चौगुले, माजी जिल्हा परिषद सदस्या मिरा फुलसुंदर, नागराळच्या सरपंच रितु गोरे, महिला आघाडीच्या तालुका उपप्रमुख पूनम लोभे यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या सुजाता नागनाथ जोगी यांना एक पैठणी, द्वितीय क्रमांकावरील शिल्पा जनक कोकणे व जगदेवी दयानंद स्वामी यांना सोन्याची नथ, तिसऱ्या क्रमांकावरील सुनंदा दत्तात्रय फावडे, शिवगंगा बिराजदार व शरयू दिक्षित यांना प्रत्येकी एक चांदीचे नाणे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस म्हणून देण्यात आले. तसेच स्पर्धेतील सहभागी झालेल्यांना भेटवस्तू व सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. लोहारा नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्षा पौर्णिमा जगदीश लांडगे, शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख सारिका प्रमोद बंगले, नगरपंचायतच्या माजी नगरसेविका कमलबाई राम भरारे, महिला आघाडीच्या शहर संघटक सुवर्णा विजय फावडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे शहरप्रमुख सलीम शेख, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शिवसेना माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सूर्यवंशी, माजी नगरसेवक अभिमान खराडे, शाम नारायणकर, श्रीकांत भरारे, जगदीश लांडगे, बाळासाहेब कोरे, जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, माजी पं स सदस्य दिपक रोडगे, महेबूब गवंडी, मेडिकल असोसिएशनचे तालुकाध्यक्ष भरत सुतार, महेबूब फकीर, प्रमोद बंगले, श्रीशैल्य स्वामी, सुरेश दंडगुले, दत्ता मोरे, प्रेम लांडगे, शिवा सुतार, आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगराध्यक्षा पौर्णिमा लांडगे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुवर्णमाला नारायणकर यांनी तर सुवर्णा फावडे यांनी आभार मानले.