वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून दरवर्षी तालुकास्तरीय शिक्षक पुरस्कार देऊन शिक्षकांचा गौरव करण्यात येतो. परंतु २०१८ मध्ये झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमापासून आत्तापर्यंत तीन वर्षे हे पुरस्कार देण्यात आले नव्हते. त्यामुळे ‘तालुकास्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाला मुहूर्त मिळेना ‘ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करून या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला कधी मुहूर्त मिळणार असा प्रश्न उपस्थित केला होता. अखेर या कार्यक्रमाला मुहूर्त मिळाला असून शनिवारी (दि.२६) लोहारा शहरात आयोजित कार्यक्रमात तालुक्यातील एकूण ३७ शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांकडून राबविण्यात येणारे वेगवेगळे उपक्रम, विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी केलेले प्रयोग आदी गोष्टींचा योग्य तो सन्मान व्हावा यासाठी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून दरवर्षी तालुका स्तरीय शिक्षक पुरस्कार देऊन शिक्षकांचा सन्मान करण्यात येतो. लोहारा तालुक्यात सहा केंद्र आहेत. एका केंद्रातून दोन याप्रमाणे १२ शिक्षकांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. याआधी २६ सप्टेंबर २०१८ ला लोहारा येथे कार्यक्रम आयोजित करून शिक्षकांचा सन्मान करण्यात आला होता. परंतु त्यानंतर आत्तापर्यंत तीन वर्षे झाली तरी हा पुरस्कार वितरण कार्यक्रम घेण्यात आला नव्हता. याबाबत गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे विचारणा केली असता कार्यालयीन विस्तार अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता कोरोनामुळे पुरस्कार वितरण कार्यक्रम घेण्यात आला नाही असे सांगितले होते. परंतु एकीकडे कोरोनाचे कारण पुढे करून हा पुरस्कार वितरण कार्यक्रम होत नसला तरी जिल्ह्यातील तुळजापूर, उस्मानाबाद, कळंब तालुक्याचे पुरस्कार मागील नोव्हेंबर २०२१ च्या दरम्यान वितरित झाल्याचे समजले होते. मग लोहारा तालुक्याचे पुरस्कार का वितरित होऊ शकले नाहीत असा प्रश्न उपस्थित केला होता. मार्च २०२० पासून कोरोना संसर्ग जाणवू लागला. त्याआधीच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला नेमकी काय अडचण निर्माण झाली होती असाही प्रश्न आम्ही उपस्थित केला होता.पुरस्कार वितरण कार्यक्रम घेऊन त्या शिक्षकांचा त्याच वर्षी सन्मान झाला तर पुरस्कार स्वीकारणाऱ्या त्या शिक्षकांनाही एक वेगळेच समाधान मिळते. परंतु तीन वर्षापूर्वीचा पुरस्कार स्वीकारताना शिक्षकांना काय वाटेल याचाही विचार होणे आवश्यक आहे. परंतु तो झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे ‘ लोहारा येथील तालुकास्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाला मुहूर्त मिळेना ! ‘ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर खडबडून जागी झालेल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी मुहूर्त मिळाला असून शनिवारी ( दि. २६) लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात एकूण ३७ शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती हेमलता रणखांब या होत्या. यावेळी उपसभापती व्यंकट कोरे, जि.प. समाजकल्याण माजी सभापती चंद्रकला नारायणकर, जि.प. सदस्या शोभा तोरकडे, पं.स.च्या माजी सभापती ज्योती पत्रिके, पं.स.सदस्य वामन डावरे, ज्ञानेश्वर परसे, नागण्णा वकील, भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डी.एस.घोलकर, गटशिक्षणाधिकारी टी.एच.सयदा, माधवराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात पुरस्कार स्वीकारणाऱ्या शिक्षकांनी सहकुटुंब हजेरी लावली होती. पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे वेगळेच समाधान दिसत होते. याच कार्यक्रमात विषय साधन व्यक्ती अनंत लहाने यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शिक्षकांसह शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलाकर येणेगुरे यांनी तर रंजना मैंदर्गी यांनी आभार मानले.
———————
या शिक्षकांचा झाला सन्मान
सन २०१९ – २०
खिजर मोरवे, राजकुमार माळवदकर, उद्धव विभुते, निर्मला दंतकाळे, मुक्ता माळी, गणेश वाघमारे, मनोज स्वामी, यु. डी. गायकवाड, विनोद ननवरे, तानाजी सुरवसे, शिवाबाई सरवदे, संगीता पाटील, गोविंद घारगे
२०२०- २१
अमोल गेडेवाड, विकास घोडके, भिमाशंकर डोकडे, रसूल शेख, चंद्रकांत सौदागर, देवेंद्र आयलाने, चंद्रकांत चांभारगे, जिनेश्वर बोळ, दशरथ कांबळे, अंकुश शिंदे, पांडुरंग फुलसुंदर, सुधाकर पेटकर
२०२१ – २२
सविता राठोड, अनंत कानेगावकर, वंदना अकोसकर, जनाबाई कंदे, स्मिता ढाकणे, राजकुमार वाघडोळे, प्रविण कदम, सुभाष कांबळे, अतुल बाबळे, विष्णु क्षीरसागर, बाळासाहेब माळी, राहुल भेडे