वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने बुधवारी (दि.३१) सकाळी साडेदहाच्या सुमारास या प्रकल्पाचे चार दरवाजे ०.१० मीटरने उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. हा प्रकल्प निर्मितीपासून ११ व्या वेळेस पूर्ण क्षमतेने भरला आहे.
तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता १२१ दलघमी एवढी असून उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता ९१.२२१ दलघमी एवढी आहे. यावर्षी पावसाळ्यात झालेल्या जोरदार पावसामुळे व उस्मानाबाद तालुक्यातील तेरणा धरणातून आलेल्या पाण्यामुळे माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली होती. सोमवारी पर्यंत या प्रकल्पात ९५ टक्के पाणीसाठा झाला होता. त्यानंतर मंगळवारी (दि.३०) रात्री लोहारा व परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे बुधवारी (दि.३१) १, ६, ९ व १४ हे चार दरवाजे ०.१० मीटरने उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केल्याने सास्तुर गुबाळ रस्त्यावरील पुलावरून पाणी जात होते. त्यामुळे हा रस्ता काही काळ बंद होता. पावसाळ्यात दरवर्षी या पुलाची हीच परिस्थिती आहे. याठिकाणी नवीन पूल उभारण्यात येत आहे. परंतु काम सावकाश होत असल्याने ही अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे सदरील नवीन पुलाचे काम लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. प्रकल्पातून पाणी सोडल्याने नदीपात्राजवळील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकल्पाची निर्मिती १९८९ साली झाली आहे. त्यावेळी पासून हा प्रकल्प दहा वेळा पूर्ण क्षमतेने भरला होता. यावर्षी पुन्हा एकदा हा प्रकल्प भरल्याने प्रकल्प भरण्याची ही ११ वी वेळ आहे. प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग केल्याने तहसीलदार संतोष रुईकर यांनी नदीपात्राच्या परिसरात भेट देऊन पाहणी केली.
——-
प्रकल्पाचे चार दरवाजे ०.१० मीटरने उघडून नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता सुरू असलेला हा विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे.
के. आर. येणगे,
शाखा अभियंता