वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील १२ ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (दि.२०) लोहारा तहसिल कार्यालयात पार पडली. मतमोजणी नंतर निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार व समर्थकांनी गुलालाची उधळण करत व फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला.
लोहारा तालुक्यातील १३ ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. परंतु वडगाव गांजा ग्रामपंचायत बिनविरोध निघाली. त्यामुळे तालुक्यातील सास्तुर, जेवळी (उ), माकणी, नागुर, विलासपुर पांढरी, माळेगाव, उंडरगाव, तोरंबा, सालेगाव, हिप्परगा रवा, वडगाववाडी, अचलेर या १२ ग्रामपंचायतीसाठी रविवारी (दि. १८ ) मतदान घेण्यात आले. त्यानंतर निकालाकडे सर्व उमेदवारांचे व त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले होते. अखेर मंगळवारी मतमोजणी झाली. मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी तहसिल कार्यालयासमोरील मैदानात गुलालाची उधळण करत व फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला. तसेच लोहारा शहरात विजयी मिरवणुका काढल्या. मतमोजणी करिता आठ टेबलवर एकूण आठ फेऱ्या झाल्या. निकाल जाहीर झाल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
———-
दोन माजी जि.प. सदस्या झाल्या सरपंच
सास्तुर गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या शितल राहुल पाटील या सास्तुर ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत. तसेच जेवळी गटाच्या माजी जि. प. सदस्या महानंदा पनुरे याही जेवळीच्या सरपंच पदी निवडून आल्या आहेत.
———
तेरा पैकी ९ ठिकाणी महिला सरपंच
लोहारा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतिचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. या तेरा पैकी ९ ठिकाणी महिला सरपंच विराजमान झाल्या आहेत. तर उर्वरित ४ ठिकाणी पुरुष सरपंच झाले आहेत.
ग्रामपंचायत व निवडून आलेले सरपंच पुढीलप्रमाणे –
वडगाव(गांजा) बिनविरोध – अनुराधा दनाने,
माळेगाव – वैभव पवार,
तोरंबा – यादव चव्हाण,
विलासपुर पांढरी – मारुती कार्ले,
नागुर – अर्चना कांबळे
सास्तुर – शितल पाटील,
जेवळी – महानंदा पनुरे,
हिप्परगा (रवा) – अभिमान कांबळे,
माकणी – स्वाती साठे,
सालेगाव – भाग्यश्री पाटील,
वडगाववाडी – सोनाली गाडेकर,
अचलेर – कांताबाई सोलंकर,
उंडरगाव – सोनाबाई वाघमारे