लोहारा (lohara) शहरासह तालुक्यातील सास्तुर (sastur), राजेगाव, धानुरी परिसरात गुरुवारी (दि.११) दुपारी अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने हजेरी लावली. यात ज्वारी, गहू, आंब्याचे नुकसान झाले आहे. तसेच शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला कडबा रानात उडून गेल्याने कडब्याचेही नुकसान झाले आहे. तसेच अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले आहेत.
लोहारा तालुक्यातील सास्तुर, राजेगाव, खेड, धानुरी परिसरात गुरुवारी (दि.११) दुपारी तीनच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील राजेगाव येथे दुपारी तीन वाजता वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस जवळपास एक तास होता. यात ज्वारी, गहू यासह आंब्याचे नुकसान
झाले आहे. तसेच गावातील अनेक घरावरील पत्रे उडून गेल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे. तालुक्यातील सास्तुर येथे दुपारी अडीचच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. या अवकाळी पावसामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले. तसेच शेतातील ज्वारी, गहू, आंबा पिकाचे नुकसान झाले व शेतात रचून ठेवलेला कडबा वादळी वाऱ्यामुळे सर्व रानात पसरला त्यामुळे कडव्याचे नुकसान झाले. या अवकाळी पावसादरम्यान काही प्रमाणात गारा पडल्याचे काहींनी सांगितले आहे. लोहारा शहरातही दुपारी व सायंकाळी वादळी वारा झाला. तसेच सायंकाळी सहा च्या सुमारास काही प्रमाणात पाऊस झाला.