लोहारा शहर व परिसरात शनिवारी (दि.८) सायंकाळी पाचच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे लोहारा शहरातील सखल भागात पाणी साचले होते. जवळपास एक तास जोरदार पाऊस झाला.
लोहारा शहर व परिसरात शनिवारी (दि. ८) जोरदार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी साडे चार वाजल्यापासून वातावरणात बदल झाला होता. त्यानंतर पाचच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसास सुरुवात झाली. दरम्यान अधून मधून विजांचा कडकडाट सुरू होता. जवळपास एक तास जोरदार पाऊस झाला. या दरम्यान वीजपुरवठा खंडित झाला होता. या जोरदार पावसामुळे लोहारा शहरातील सखल भागात पाणी साचले होते. लोहारा शहरासह मोघा, लोहारा खुर्द, खेड, धानुरी, माकणी, कानेगाव, भातागळी, कास्ती, नागुर, सास्तुर, मुर्षदपूर, होळी, राजेगाव, चिंचोली सह तालुक्यातील बहुतांश गावात पाऊस झाला. शुक्रवारी सायंकाळी ही काही वेळ जोरदार पाऊस झाला. यावर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्व कामे उरकून घेतली आहेत. यावर्षी पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. त्यामुळे बळीराजा लवकरच पेरणीस सुरुवात करण्याचा अंदाज आहे. पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे. रात्री उशिरापर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच होता. शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास गेलेली लाईट रविवारी सकाळपर्यंत आली नव्हती. दरम्यान शनिवारी झालेल्या या पावसात जोरदार विजांचा कडकडाट सुरू होता. तालुक्यातील उदतपुर येथील महादेव चंद्रहर्ष पवार यांच्या शेतात वीज पडून एक म्हैस मरण पावली आहे. लोहारा तालुक्यातील आष्टा कासार येथेही जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे ओढे प्रवाहित झाले होते.