लोहारा शहरासाठी मंजूर करण्यात आलेली माकणी धरणातून लोहारा शहर पाणीपुरवठा या योजनेचे भूमिपूजन माजी खासदार रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, युवासेनेचे मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि.११) करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार रवींद्र गायकवाड हे होते. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, किरण गायकवाड, नगरपंचायतच्या नगराध्यक्षा वैशाली खराडे, उपनगराध्यक्ष आयुब शेख, पाणीपुरवठा सभापती शमाबी आयुब शेख, बांधकाम सभापती सुमन रोडगे, महिला व बालकल्याण सभापती संगिता पाटील, शामल माळी, माजी सरपंच नागन्ना वकील, जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, नगरसेविका आरती कोरे, कमल भरारे, आरती गिरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार ज्ञानराज चौगुले म्हणाले की, लोहारा शहराला विकासाकडे नेण्याचे काम आम्ही करत आहोत. लोहारा शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेण्यात काही तांत्रिक अडचणी होत्या. त्यामुळे या योजनेला उशीर झाला. पण आज या योजनेचे भूमिपूजन झाले आहे. लोहारा शहरासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे याचे समाधान आहे. ही पाणीपुरवठा योजना कंत्राटदाराने दिलेल्या मुदतीत पूर्ण करावी अशी सूचना आमदार चौगुले यांनी यावेळी केली.
यावेळी बोलताना माजी खासदार रवींद्र गायकवाड म्हणाले की, या शहराला जास्तीत जास्त निधी देण्याचे काम आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले आहे. यापुढील काळातही लोहारा शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी केले. यावेळी किरण गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अभिमान खराडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी मक्तेदार यांनी तर सारिका बंगले यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी लोहारा नगरपंचायतचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.