लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील स्पर्श रुग्णालय व निवासी दिव्यांग शाळा सास्तूरच्या वतीने आयोजित केलेल्या दिव्यांग (अपंगत्व) निवारण शिबिराचा रविवारी (दि.२०) समारोप झाला. शिबिराच्या शेवटच्या दिवशी १३२ बालकांची तपासणी व २३ बालकांची शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात मागील १६ वर्षांपासून हे शिबीर घेण्यात येते. या दोन दिवसात एकुण ३४२ बालकांच्या तपासणी व ५८ बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. डॉ. मयुरेश वारके, डॉ. हिमांशू बेदरे, डॉ. प्रमोद काळे, डॉ. राहुल सरदार, डॉ. रोहन मेहता, डॉ. सागर धडस, डॉ. जिज्ञासा पाटील या मुंबई येथील रोटरी क्लबच्या डॉक्टर्सनी शस्त्रक्रिया पार पाडल्या. या संपूर्ण शस्त्रक्रिया पार पाडण्यासाठी मुंबई अंबरनाथ रोटरी प्रेसिडेंट पराग पाटील, शिरीष बेंडाळे, रोटरी क्लब ठाणे ग्रिनसिटीचे संग्राम जोशी, उद्य पाटील, सतीश शेट्टी, पवन अद्नानी, शिरीष सोनागडकर, रोटरी क्लब डोंबिवली मुंबईचे प्रशांत अंबेकर, देवनार मुंबई रोटरी अध्यक्ष राजश्री मोकाशे, नागेश भट, परिचारक फौंडेशन पंढरपूरचे राहुल पटवर्धन यांनी विशेष सहकार्य केले.
शिबिराच्या समारोप कार्यक्रमात प्रास्ताविक पर भाषणात स्पर्श रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी म्हणाले कि, गेल्या १६ वर्षात १६०० च्या वर बालकांना समाजाच्या प्रवाहात आणू शकल्याचा विशेष आनंद होत आहे. गेल्या ४ ते ५ शिबिरामधील काही बालके आज स्वत:च्या पायावर चालत त्यांचे अनुभव सांगण्यासाठी आले. त्यांचे अनुभव ऐकूण शिबिराच्या आयोजनाचे चीज झाले याबद्दल अभिमान वाटत आहे. या बालकांच्या चेहऱ्यावर आनंद, हासू या शिबिराचे सार्थक झाल्याचा आनंद देतो असे गौरोद्गार त्यांनी काढले. याबद्दल त्यांनी लंडन येथील डॉ. जॉन क्लेग, रोटरी क्लब मुंबई, अंबरनाथ, देवनार, चेंबूरचे डॉ. मयुरेश वारके, डॉ. प्रमोद काळे व इतर सर्व डॉक्टरांचे आभार मानले.
निवासी दिव्यांग शाळा सास्तुरचे मुख्याध्यापक बालाजी नादरगे व त्यांच्या सर्व स्टाफचे, तसेच फीजीओथेरपिस्ट डॉ. मंगेश कुलकर्णी या सर्वांचे रमाकांत जोशी यांनी आभार मानले. वरील सर्वांच्या अथक परिश्रमामुळे हि बालके या शिबिरासाठी येऊ शकली तसेच जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग धाराशिव, लातूर, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी लातूर, धाराशिव तसेच धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, गुलबर्गा, बिदर इत्यादी जिल्ह्यातील अस्थिव्यंग शाळांचे विद्यार्थी शिबिरासाठी पाठवल्या बद्दल आभार मानले. पुढील वर्षीही या शिबिराचे आयोजन करण्यात येईल. त्याची तारीख लवकर कळविण्यात येईल असे त्यांनी शेवटी सांगितले.
शस्त्रक्रिये नंतर घ्यावयाची काळजी याबद्दल डॉ. मयुरेश वारके यांनी पालकांना माहिती सांगितली. तसेच प्लास्टर काढेपर्यंत काही अडचण आल्यास स्पर्श रुग्णालयाशी सपंर्क साधून गरज पडल्यास बाळाला तपासणीसाठी घेऊन यावे असे आवाहन केले.