लोहारा तालुक्यातील माकणी येथील ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेस आजपासून शनिवारी ( दि. १४) सुरुवात होत आहे. दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त ही यात्रा भरवली जाते. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे.
लोहारा, उमरगा, औसा तालुक्यातील भक्तांचे श्रध्दास्थान असलेले लोहारा तालुक्यातील माकणी येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा शनिवारी ( दि. १४) सुरु होत आहे. दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त ही यात्रा भरवली जाते. यात्रेनिमित्त माकणी येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहा दरम्यान दररोज विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. शनिवारी ( दि. १४) येथील विठ्ठल रुक्मीणी मंदिरापासून श्री सिध्देश्वर मंदिरापर्यंत गावातील मुख्य रस्त्याने ढोल ताशा, हलगी, टाळ मृदंगाच्या गजरात श्री च्या काठीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक सायंकाळी ५ च्या दरम्यान सिद्धेश्वर मंदिर परिसरात आल्यानंतर काल्याच्या वाटपाने मिरवणूकीचे विसर्जन करण्यात येईल. या यात्रा महोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेला कुस्तीचा जंगी फड रविवारी ( दि. १५) होणार आहे. यासाठी यात्रा कमिटी, ग्रामपंचायत कार्यालय व गावातील कुस्तीगीराकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. शेवटची कुस्ती विजेत्या मल्लास २१ हजार व चांदीची गदा देण्यात येणार आहे.
या यात्रेदरम्यान लहान मुलांच्या मनोरंजनासाठी रहाट पाळणे यासारखे अनेक मनोरंजनाची साधने आली आहेत. याबरोबरच केळी, गृहपयोगी वस्तू, खेळणी, हॉटेल, गिरके आदी व्यापारीही त्यांची दुकाने घेवून मोठ्या संख्येने आली आहेत. ही यात्रा पुर्वीपासून केळीच्या व्यापारासाठी प्रसिध्द आहे. या यात्रेदरम्यान केळीच्या व्यापारातून दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होते. यामुळे परिसरातील केळीचे व्यापारी मोठ्या संखेने येतात. यात्रेदरम्यान कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार होऊ नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवन्यात येणार आहे.