लोहारा तालुक्यातील माकणी येथील ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेनिमित्त रविवारी (दि.१५) कुस्त्यांची दंगल झाली. यात राम कुसळकर (माकणी) व संदीप नरवडे (रामलिंग मुदगड) यांच्यात अंतिम कुस्ती झाली. ही कुस्ती राम कुसळकर (माकणी) यांनी जिंकली. कुस्त्या पाहण्यासाठी माकणीसह पंचक्रोशितील हजारो कुस्ती प्रेमींनी मोठी गर्दी केली होती.
लोहारा, उमरगा, औसा तालुक्यातील भक्तांचे श्रध्दास्थान असलेले माकणी येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा शनिवारी (दि.१४) सुरु झाली. दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त ही यात्रा भरवली जाते. यात्रेनिमित्त ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहा दरम्यान दररोज विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या कुस्त्या रविवारी (दि.१५) पार पडल्या. सिद्धेश्वर मंदिरासमोरील मैदानात ही कुस्ती स्पर्धा पार पडली. यातील अनेक मल्लांच्या कुस्त्या लक्षवेधी ठरल्या. राम कुसळकर (माकणी) व संदीप नरवडे (रामलिंग मुदगड) यांच्यात अंतिम कुस्ती झाली. ही कुस्ती यात्रा कमिटीचे अध्यक्ष मधुकर साठे, माजी सरपंच विठ्ठल साठे, पंडित ढोणे, शुभम चौगुले, भागवत आलमले, दादासाहेब मुळे, ओंकार साठे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत लावण्यात आली. ही कुस्ती झटपट निकाली निघाली. अंतिम कुस्ती विजेत्या राम कुसळकर (माकणी) याला ११ हजार रुपये व चांदीची गदा देण्यात आली. यावेळी माकणीसह पंचक्रोशीतील मल्लांच्या कुस्त्या लक्षवेधी ठरल्या. कुस्त्या पाहण्यासाठी माकणीसह परिसरातील कुस्तीप्रेमींना मोठी गर्दी केली होती. या कुस्त्यासाठी पंच म्हणून शहाजी आळंगे, अंकुश कोरडे, फुलचंद आळंगे, राम लोभे यांनी काम पाहिले.
ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी यावेळी भविकांनी मोठी गर्दी केली होती. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात रहाट पाळणे, खेळणी, मिठाई, स्टेशनरीचे दुकाने, यासह केळी व पेरू च्या व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने थाटली होती. यात्रेसाठी बाल – गोपाळासह महिला, ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.