लोहारा तालुक्यातील विलासपूर पांढरी व वडगाव ( गां) येथील शेतकऱ्यांनी लोहारा येथील उपविभागीय अधिकारी पाटबंधारे उपविभाग क्र. ८ च्या कार्यालयासमोर माळेगाव – पांढरी साठवण तलावातील पाणी बंद केल्या प्रकरणी गुरुवारी (दि.३०) उपोषण सुरू केले आहे.
याबाबत विलासपूर पांढरी व वडगाव ( गां) येथील शेतकऱ्यांनी अनेकदा निवेदने देऊन त्यांची अडचण मांडली होती. तरीही काहीच कार्यवाही न झाल्याने गुरुवारी त्यांनी उपोषण सुरू केले आहे. उपविभागीय अधिकारी पाटबंधारे उपविभाग क्र. ८ या कार्यालयास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही माळेगाव-पांढरी साठवण तलावाशेजारील परवानाधारक शेतकरी असून आम्ही मागील ५ ते १० वर्षापासून पाणी परवाने आपल्या विभागामार्फत घेतले आहेत. आजपर्यंत शासनाच्या नियमानुसार पाणीपट्टी व इत्तर देयक भरत आहोत आणि आजतागायत चेअरमन व सदस्य संभाजी महाराज पाणी वापर संस्था माळेगाव हे आमचे खालील परवानाधारक शेतक-यांचे २४ ऑक्टोबर २०२४ पासून शेतीसाठी पाणी उपसा करु देत नाहीत. आम्ही शेतकरी वारंवार संबंधीत कार्यालयाशी संपर्क केला असता आम्हा परवानाधारक शेतकऱ्याना पाणी उपसा करु देत नाहीत असे पत्र दिनांक २६ डिसेंबर, ३१ डिसेंबर, १४ जानेवारी ला संबंधीत कार्यालयाशी आम्ही पत्रव्यवहार केला. दिनांक ९ व १० जानेवारी रोजी तहसिल कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले तरी संबंधीत संभाजी महाराज पाणी वापर संस्था माळेगाव व संबंधीत कार्यालय लोहारा व उमरगा सदरील बाबीची कोणतीही दखल घेतलेली नाही. आणि आम्हा परवानाधारक शेतक-यांना शेतीसाठी पाणी उपसा करु देत नाहीत.
सद्यस्थितीत आमचे पिक वाळत आहे. या पिकांचे नुकसान होत आहे. प्रत्येक शेतकऱ्यांचे जवळपास ७० हजार ते १ लाख रुपयांचे नुकसान होत आहे. या नुकसानीस संबंधीत कार्यालय व पाणी वापर संस्था असेल. सदरील संभाजी महाराज पाणी वापर संस्था २०२२ मध्ये स्थापन झाली. यापुर्वीपासून आम्ही शेतकरी परवानाधारक आहोत. त्यामुळे आम्हा परवानाधारक शेतकऱ्यांचा तलावातील पाणी वापराचा अधिकार आहे. यापुर्वी आमच्याकडून पाणीपट्टी स्विकारली आहे. परंतु या वर्षी संबंधीत पाणीपट्टी कार्यालय व संबंधीत पाणी वापर संस्था आम्हा परवानाधारक शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी स्विकारत नाही. त्यामुळे सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करुन आम्हा परवानाधारक शेतकऱ्यांना न्याय मिळवून दयावा. तसेच शेतकरी सिंचन कायदा २००५ या कायद्याचे तंतोतंत पालन करुन आम्हा परवानाधारक शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपसा चालू करून द्यावे व संबंधित पाणी वापर संस्थेवर कारवाई करावी या मागणीसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणात किसन खोत, तानाजी बिराजदार, नवनाथ फुलसुंदर यांच्यासह नितीन कार्ले, सचिन कार्ले, विठ्ठल जांभळे, परमेश्वर कार्ले, विठ्ठल जांभळे, सारिका खोत, अनिता जांभळे, शोभा फुलसुंदर, गायत्री बिराजदार, फुलाबाई बिराजदार, शिवाबाई बिराजदार, श्रीदेवी कार्ले, मीनाक्षी देटे यांच्यासह महिला व नागरिक सहभागी झाले आहेत. या उपोषणास ग्रामपंचायत सदस्य शोभा बिराजदार, भाग्यश्री पाटील, सचिन मुळे व ओम पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे.