लोहारा तालुक्यातील मार्डी येथील जिंदावली ऊरूसास मंगळवारी (दि.४) संदल मिरवणुकीने प्रारंभ होणार असून हिंदू मुस्लिम समाजाचे ऐक्याचे प्रतिक असलेल्या या उरुसानिमित्त आज सायंकाळी तहसीलदार यांच्या डोक्यावर मानाचा संदल देऊन संदलची मिरवणूक काढण्यात येणार आहे.
लोहारा तालुक्यातील मार्डी येथे हजरत ख्वाजा जैनुद्दीन चिस्ती उर्फ जिंदावली यांचा दर्गा असून हिंदु-मुस्लिमांचे ते श्रध्दास्थान आहे. दरवर्षी येथे ऊरूस भरतो. या ऊरूसास जिल्ह्यासह कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात. यावर्षीही ऊरूसा निमित्त सलग तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार पासून ऊरूसास प्रारंभ होणार आहे. बुधवारी (दि.५) चिरागाचा कार्यक्रम, कव्वाली कार्यक्रम तसेच गुरुवारी (दि.६) सकाळी कुराण पठण, जियारतचा कार्यक्रम होणार आहे. उरुसनिमित्त दर्ग्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.