लोहारा (lohara) तालुक्यातील उंडरगाव ते तोरंबा पाटी या ७ किमी रस्त्याची दुरावस्था झाली आहे. यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
लोहारा तालुक्यातील उंडरगाव, तुळजापूर तालुक्यातील कार्ला व धाराशिव तालुक्यातील तोरंबा हा रस्ता आहे. तीन तालुक्याच्या सीमेवरील हा ७ किमी लांबीचा रस्ता मागील २५ ते ३० वर्षांपूर्वी करण्यात आला होता. त्यानंतर त्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती सुध्दा करण्यात आली नाही. त्यामुळे या रस्त्याची दयनीय दुरावस्था निर्माण झाली असून रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता हे वाहनचालकांना कळेना असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हा रस्ता सतत रहदारीचा असल्याने अनेक छोटे मोठे अपघात होऊन काही जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. त्यामुळे नागरिक व वाहनचालक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे दोन्ही तालुक्यांच्या लोकप्रतिनिधींनी व जिल्ह्याच्या खासदारांनी याकडे लक्ष देऊन विधानसभा निवडणुकीपूर्वी तोरंबा पाटी ते उंडरगाव रस्त्याचे काम संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून मार्गी लावावे अन्यथा तीन गावातील नागरीक येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकतील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. मागील अनेक वर्षापासून तोरंबा पाटी ते उंडरगाव या रस्त्याची दुरावस्था झाली असुन या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. या खराब रस्त्यामुळे भुरटेचोर वाहने आडवुन सतत लुटमार करत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. मागील अनेक वर्षांपासून आम्ही वीट उद्योजक वर्गणी गोळा करून हे खड्डे बुजवित आहोत अशी प्रतिक्रिया उंडरगाव येथील हणमंत रवळे, राजेंद्र सुर्यवंशी यांनी व्यक्त केली आहे.