लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात ११ वी व वरिष्ठ महाविद्यालयातील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी देवगिरी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथील उपप्राचार्य प्रा. एन. जी. गायकवाड, इंग्रजी विभागातील तज्ञ प्रा. शेख साबिहा, पदार्थ विज्ञान विभागातील तज्ज्ञ प्रा. डॉ. किरण पतंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. आर. घोलकर, उपप्राचार्य प्रा. अभिजीत सपाटे, बाबू हेड्डे यांची उपस्थिती होती. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये इ. ११ वी मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागतप्रसंगी बोलताना प्रा. एन. जी. गायकवाड म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागातूनसुद्धा विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनिअरिंगसारख्या महाविद्यालयात प्रवेश मिळवत आहेत. तसेच जीवनामध्ये ध्येय निश्चित करून करिअरची वाटचाल करावी, मोबाइलपासून विद्यार्थ्यांनी दूर राहावे, योग्य गोष्टीसाठीच मोबाईलचा वापर करावा’ असा सल्ला उपप्राचार्य प्रा. एन. जी. गायकवाड यांनी यावेळी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना दिला. प्रा. शेख साबिहा यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरी मिळविण्यासाठी आता शाखेचे बंधन नाही, कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थीसुद्धा आय. टी. क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी मिळवू शकतात अशी माहिती उपस्थितांना दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. आर. घोलकर यांनी सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करताना संस्थेचे सरचिटणीस आ. सतीश चव्हाण यांची आगामी काळातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असणाऱ्या ध्येय धोरणाविषयी माहिती दिली. तसेच संस्थेचे देवताळा या ठिकाणी सुरु असणाऱ्या क्रांतिवीर दत्तोबा भोसले डिफेन्स अकॅडेमी विषयी उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली. पोलीस भरतीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांचे प्रशिक्षक अमरसिंह टेकाळे यांचा यावेळी सत्कार केला. उपप्राचार्य प्रा. अभिजित सपाटे यांनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा सर्वांसमोर ठेवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रशांत माने यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रा. व्यंकट घोडके, गणेश गरड, दादा साठे यांनी विशेष मेहनत घेतली. प्रा. व्ही. डी. तुंगे यांनी आभार मानले.