भविष्यातील उन्हाची दाहकता लक्षात घेऊन प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. डी. आर. घोलकर यांनी लोहारा येथे केले.
लोहारा (lohara) शहरातील भानुदासराव चव्हाण कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने बुधवारी (दि.५) राष्ट्रीय सेवा योजना व भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बसस्थानक परिसरात वृक्षलागवड करून ‘जागतिक पर्यावरण दिन’ ( World Environment Day) साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून लोहारा शहरातील नवीन बस स्टॅन्ड या ठिकाणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी आर. घोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वृक्ष लागवड’ करण्यात आली. या वृक्ष लागवड कार्यक्रमास महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आयुब शेख, शब्बीर गवंडी, निसर्गमित्र श्रीनिवास माळी, बाबू हेड्डे, प्रा. डॉ. प्रशांत माने, प्रा. आर. एम. कोटनूर, एनएसएस सहकार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. संगीता सरवदे, एनएसएस कार्यक्रमाधिकारी व भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. एन. एस. मोरे यांच्यासह दादा साठे, गणेश गरड ,मनोज पवार, मारुती कोकरे आदी कर्मचारी उपस्थित होते.
पुढे बोलताना प्राचार्य घोलकर म्हणाले की, यावर्षी संपूर्ण देशात तापमानवाढीमुळे उष्णतेची तीव्र लाट आली होती. पृथ्वीचे तापमान ४० ते ४५ अंशावर जाऊन तापमानाने अतिउच्च पातळी गाठली होती. निसर्गाने तमाम मानवजातीला दिलेली हि धोक्याची घंटा आहे. ६० अंशाला सजीव सृष्टी राहू शकत नाही. यावर नियंत्रण आणण्यासाठी वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. त्यामुळे पर्जन्यमान देखील वाढेल, एक झाड सावलीयोग्य होण्यासाठी किमान ५ वर्षे कालावधी लागतो. त्यामुळे भविष्यातील उन्हाची दाहकता लक्षात घेऊन प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावणे गरजेचे आहे असे मत प्राचार्य डॉ. डी. आर. घोलकर यांनी व्यक्त केला. यावर्षी लोहारा परिसरात शंभर झाडे लावण्याचा व ती टिकवण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी केला. हातावर घेतलेले काम आणि लावलेले झाड कधीच वाया जाता कामा नये असा निर्धारदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी निसर्गमित्र श्रीनिवास माळी यांनी झाडे व पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिल्याबाबद्दल प्राचार्य घोलकर यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.