लोहारा (Lohara) शहरातील शासकीय धान्य गोदाम लगत लोहारा नगरपंचायतने अनधिकृत उभारलेल्या घनकचरा प्रकल्पाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी व घनकचरा प्रकल्प हटवण्याच्या मागणीसाठी शिवसेना (उबाठा) पक्षाचे तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांनी लोहारा नगरपंचायत कार्यालयासमोर सोमवार (दि.१९) पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी गुरुवारीही हे उपोषण सुरूच होते. गुरुवारी (दि. २२ ) विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची लोहारा शहरातील शिष्टमंडळाने भेट घेतली. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. यातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करायला आम्ही भाग पाडू असे आश्वासन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिष्टमंडळाला दिले.
लोहारा शहरातील घनकचरा प्रकल्पाच्या विरोधात शिवसेना (उबाठा) पक्षाचे तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांनी घनकचरा प्रकल्पाविरोधात यापूर्वी निवेदन दिले होते. तसेच जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन घनकचरा प्रकल्पाबाबत परिस्थिती सांगितली होती. त्यांनी सोमवार (दि.१९) पासून उपोषण सुरू केले आहे. सदर प्रकल्प मस्जिद, स्मशानभूमी आणि वसाहतीजवळ असून प्रचंड दुर्गंधी, प्रदूषण आणि रोगराईचा धोका निर्माण करत आहे. तालुका पुरवठा गोडाऊनच्या शेजारी हा प्रकल्प असल्यामुळे धान्य साठ्यात कीड व उंदरांचे प्रमाण वाढले आहे, ज्यामुळे अन्नधान्य दूषित होऊन जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे असा आरोप अमोल बिराजदार यांनी केला आहे. त्यामुळे लोहारा नगरपंचायतच्या कामकाजाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, घनकचरा प्रकल्पातील भ्रष्टाचारात सहभागी असलेले सर्व अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर त्वरित निलंबनाची कारवाई व्हावी, शासकीय जमिनीचा गैरवापर करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, धार्मिक स्थळे, वसाहती, पुरवठा गोडाऊन व शेतीजवळ असलेला घनकचरा प्रकल्प तातडीने अन्यत्र हलवावा यासह अन्य काही मागण्यासाठी हे उपोषण सुरू केल्याचे बिराजदार यांनी सांगितले. गुरुवारी (दि.२२) उपोषणाचा चौथा दिवस होता. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे तुळजापूर हून लातूरकडे जात असताना लोहारा शहरातील शिष्टमंडळाने तालुक्यातील आरणी पाटी येथे त्यांची भेट घेऊन घनकचरा प्रकल्पाबाबत निवेदन दिले.

यावेळी विरोधी पक्षनेते दानवे म्हणाले की, लोहारा शहरामध्ये ज्या पद्धतीने घनकचरा प्रकल्प व्हायला पाहिजे होता, नीट पद्धतीने युटी लायझेशन व्हायला पाहिजे होत. परंतु काही लोकांच्या आर्थिक हितसंबंधासाठी जिथे धान्य गोडाऊन आहे, जिथून धान्य तालुक्यात जात. याला पर्यावरण विभागाची मान्यता नाही. आरोग्याचा काय होईल पर्यावरणाच काय होईल याचा विचार झाला नाही. या आंदोलनाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. यातील अधिकाऱ्यांवर कारवाई करायला आम्ही भाग पाडू असे आश्वासन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी आ. प्रवीण स्वामी यांच्यासह शिष्टमंडळातील माजी नगराध्यक्षा पौर्णिमा लांडगे, अनिल जगताप, महेबूब गवंडी, सलीम शेख, हरी लोखंडे, रघुवीर घोडके, राजू स्वामी, वीरभद्र फावडे, पवन मोरे, प्रेम लांडगे, बाबा सूर्यवंशी यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.