धाराशिव भारत स्काऊट्स आणि गाईड्स जिल्हा कार्यालय धाराशिव, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, धाराशिव व हायस्कूल लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने हायस्कुल लोहारा शाळेत आयोजित तीन दिवसीय जिल्हा मेळाव्याचा समारोप शनिवारी (दि.१०) झाला. यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्या शाळांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. हायस्कुल लोहारा शाळेने विविध स्पर्धात एकूण ११ बक्षिसे मिळवून चॅम्पियनशिप मिळवली.
लोहारा शहरातील हायस्कुल लोहारा शाळेत दि. ८ ते १० फेब्रुवारी या कालावधीत स्काऊट्स आणि गाईड्स चा तीन दिवसीय जिल्हा मेळावा घेण्यात आला. या कालावधीत विविध कार्यक्रम, स्पर्धा घेण्यात आल्या. शेवटच्या दिवशी शनिवारी (दि.१०) सकाळी शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती. या शोभायात्रेत सहभागी १७ शाळांनी विविध देखावे केले होते. हायस्कुल लोहारा शाळेतून सुरू झालेली ही शोभायात्रा डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, जगदंबा मंदिर, रजिस्ट्री ऑफिस मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देखाव्यांनी उपस्थित नागरिकांची मने जिंकली. यात शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाचा सोहळ्याचा देखावा सादर केला होता. तसेच वारकरी दिंडी, भारतमाता, राम लक्ष्मण, यासह काही शाळांनी लेझीम नृत्य, आदिवासी नृत्य आदी विविध प्रकार सादर केले.
दुपारी एक वाजता बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी आ. ज्ञानराज चौगुले, आ. विक्रम काळे, जिल्हा संघटक आयुक्त विक्रांत देशपांडे अभिमान खराडे, भास्कर बेशकराव, मेळावा संयोजक तथा हायस्कूल लोहारा प्रशालेचे मुख्याध्यापक दयानंद पोतदार, मेळावा प्रमुख दिपक पोतदार, सहाय्यक मेळावा प्रमुख सुरेश वाघमोडे, वैजिनाथ पाटील, सविता पांढरे, नगरसेवक अमीन सुंबेकर, प्रशांत काळे, जालिंदर कोकणे, श्रीकांत भरारे, अविनाश माळी, दिपक रोडगे, राजेंद्र माळी, प्रमोद बंगले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. ज्ञानराज चौगुले म्हणाले की, स्काऊट आणि गाईड ही शैक्षणिक क्षेत्रातील खूप मोठी चळवळ आहे. यातून विद्यार्थ्यांना शिस्त मिळते तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून स्वतःच्या आई वडिलांचे व शिक्षक, शाळेचे नावलौकिक करावे. तसेच स्वतःला कमी न समजता आपल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात आपण नावलौकिक करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी आ. विक्रम काळे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या शाळांना बक्षीस वितरण करण्यात आले. यात हायस्कूल लोहारा शाळेने एकूण ११ बक्षिसे मिळवत चॅम्पियन शिप मिळवली. एकूणच तीन दिवसीय मेळाव्यात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलाप्रकारांना लोहारा शहरवासीयांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली.