लोहारा तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कूल मध्ये दिवाळी (Diwali) सण साजरा करण्यात आला. यामध्ये दिवाळीतील वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मी पूजन, पाडवा, भाऊबीज या सणांची कलाकृती सादर करण्यात आली होती.
यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रत्येक सणाचे चित्र, प्रतिकृती हुबेहूब सादर केली. त्याचबरोबर जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आली. यावेळी जंजिरा किल्ला सर्वांचे आकर्षण ठरले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेतील सर्व पालक वर्ग व विद्यार्थी या सणांचा आनंद घेण्यासाठी व प्रत्येक सणाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपली रुढी, परंपरा व ते साजरा करण्यामागील शास्त्रीय कारणे सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी जाणून घेतले. वसुबारस सणाला गाईची पूजा केली जाते. धनत्रयोदशी दिवशी धनाची म्हणजे धनधान्याची, पैशाची, सोन्याची, नाण्यांची पूजा केली जाते. नरक चतुर्थी या दिवशी अभंग्य स्नान केले जाते. लक्ष्मीपूजन या दिवशी लक्ष्मी मातेची व आपण ज्या व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करतो त्याची पूजा केली जाते. पाडवा हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. साडेतीन मुहूर्तापैकी हा एक दिवस या दिवशी सर्व साहित्यांची, घर, दुकान, वाहने याची पूजा करतो. भाऊबीज हा सण भावा व बहिणीमध्ये अतूट नाते निर्माण करतो आदी माहिती यावेळी सांगण्यात आली. या सर्व सणांचा आनंद पालकांनी व विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये घेतला.
तसेच जंजिरा किल्ला त्यामध्ये बुरुज, मंदिर, विहीर, गडावरील घरे, तोफ, बुलंद दरवाजा यांचे प्रत्यक्ष अनुभव घेता आला. तसेच विद्यार्थ्यांनी वेगवेगळे स्टॉल लावले होते. यातून कमवा व शिका याची अनुभूती आली. एकंदरीत सर्व पालकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये हा सोहळा पाहून आनंद संचारला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका हिरा दयानंद सोलापूरे (हावळे ) यांनी रिबीन कापून कार्यक्रमाची सुरुवात केली. हा कार्यक्रम पार पडण्यासाठी सर्व शिक्षक, कर्मचारी यांनी प्रचंड मेहनत घेतली. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष अशोकराव जवळगे, सचिव किशोर साळुंके, व ॲड. दीपक जवळगे यांनी सर्वांचे कौतुक केले.