विद्यार्थ्यांनी स्वतःमधील विशेष गुण ओळखून करिअर निवडावे असे आवाहन प्रा. संतोष पवार यांनी लोहारा येथे बोलताना केले.
लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ शनिवारी (दि.२०) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, नळदुर्ग येथील मराठी विभागाचे प्रा. संतोष पवार यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन. जी. गायकवाड, प्रा. शेख सबिहा, प्रा. डॉ. विष्णू पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. आर. घोलकर हे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य अभिजीत सपाटे यांनी करून बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयातील शिक्षकांनी घेतलेल्या विशेष परिश्रमाची व उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.
मराठी कविता व साहित्याच्या माध्यमातून मनोरंजन करून प्रा. संतोष पवार यांनी ‘विद्यार्थ्यांनी स्वतःमधील विशेष गुण ओळखून करिअर निवडावे’ असा सल्ला यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. या निरोप समारंभामध्ये विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे प्रदर्शन केले. काही विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील दोन वर्षातील अनुभव व्यक्त करून, महाविद्यालयाने आम्हाला दिलेल्या ज्ञानाच्या जोरावर स्वतःच्या पायावर उभा राहू असा आत्मविश्वास व्यक्त केला. काहींनी आम्ही एमपीएससी व युपीएससी सारख्या परीक्षा देऊन प्रशासनातील उत्तम अधिकारी बनू असा आशावाद व्यक्त केला. तर काहींनी अशा प्रकारच्या सोयी सुविधा युक्त महाविद्यालयात शिकण्याची संधी आम्हाला मिळाली यासाठी आम्ही खूप भाग्यवान आहोत असे मत व्यक्त केले.
संस्थेचे सरचिटणीस आ. सतीशभाऊ चव्हाण यांनी या सर्व सोयी सुविधा आम्हाला या भागात उपलब्ध करून दिल्या याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. महाविद्यालय सोडून जाताना दुःख होत असल्याची भावना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. आगामी काळात देखील गुणवत्तेच्या व दर्जेदार शिक्षणाच्या बाबतीत आम्ही अग्रेसर राहू व कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून महाविद्यालयातून बाहेर पडणारा विद्यार्थी बेरोजगार राहणार नाही, त्याला नोकरी आम्ही मिळवून देऊ किंवा स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन करू असा आशावाद प्राचार्य डॉ. डी. आर. घोलकर यांनी अध्यक्षीय समारोपात व्यक्त केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. हणमंत कल्बूर्गे, प्रा. शिवाजी जाधव, प्रा. स्नेहलता करदोरे, प्रा. रत्नमाला पवार, प्रा. सुनंदा सूर्यवंशी, प्रा. अंजली पटवारी, प्रा. शितल ठेले यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मल्लिनाथ चव्हाण यांनी तर प्रा. स्वाती माने यांनी आभार मानले.