सर्वसामान्यांची कामे वेळच्या वेळी करा, त्यांना त्रास देऊ नका अशी सूचना अधिकाऱ्यांना करत उपस्थित नागरिकांच्या काय समस्या आहेत त्या ऐकून घेऊन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कामे तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.
लोहारा पंचायत समिती सभागृहात बुधवारी (दि. ४) खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा जनता दरबार पार पडला. यावेळी तहसीलदार काशिनाथ पाटील, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे, लोहारा नगरपंचायतचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. गोविंद साठे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संतोष घोडके, तालुका कृषी अधिकारी महेश देवकते, प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुभाष चव्हाण यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी त्यांच्या विविध अडचणी खासदार राजेनिंबाळकर यांच्या समोर मांडल्या. या जनता दरबारात एमएसईबी, महसूल विभाग, पुरवठा विभाग यासह अन्य विभागाच्या मिळून जवळपास ९० तक्रारी आल्या होत्या. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदान, पिक विमा, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाच्या व अन्य विभागाच्या संदर्भात तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांच्या समक्ष नागरिकांच्या ज्या समस्या आहेत व त्यावरील उपाययोजना खासदार निंबाळकर यांनी प्रशासनाला सुचवल्या. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दिपक जवळगे, तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, पंडित ढोणे, सलीम शेख, महेबूब गवंडी यांच्यासह नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.