कर्नाटक राज्यातील भालकी येथे झालेल्या महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळा विटंबन प्रकरणाच्या निषेधार्थ लोहारा शहर सोमवारी (दि. २०) कडकडीत बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
लोहारा येथील लिंगायत समाजाच्या वतीने सोमवारी (दि.२०) शहर कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपापली दुकाने बंद ठेवली. शहरातील लिंगायत समाज बांधवांनी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत लोहारा तहसिल कार्यालयात जाऊन लोहारा तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली आहे. ही घटना अतिशय गंभीर असून संपूर्ण समाजाच्या भावना दुखावणारी आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर त्वरित कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी माजी सरपंच शंकर जट्टे, बसवराज पाटील, दत्तात्रय बिराजदार, श्याम नारायणकर, दिपक मुळे, हरी लोखंडे, के. डी. पाटील, ओम पाटील, ओम कोरे, वीरभद्र फावडे, प्रशांत काळे, विजयकुमार ढगे, प्रमोद बंगले, जालिंदर कोकणे, महेश कुंभार, मल्लिनाथ फावडे, बाळू माशाळकर आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.