लोहारा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून शनिवारी (दि.२८) तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात तीन वर्षांतील एकूण ३५ शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
लोहारा शहरातील सप्तरंग मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, उमरगा गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुभाष चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिपक जवळगे, तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, अमोल बिराजदार, सलीम शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. ज्ञानराज चौगुले म्हणाले की, भविष्यात चांगले विद्यार्थी घडावेत यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. इंग्रजी शाळांचा ओढा वाढत असतानाही मराठी शाळांचा टक्का टिकवून ठेवला आहे. त्याचे श्रेय शिक्षकांना द्यावे लागेल. विद्यार्थ्यांनी फक्त सुशिक्षित होऊन भागणार नाही तर सुसंस्कृत होणे गरजेचे आहे. भविष्यात जर मला संधी मिळाली तर प्राथमिक शिक्षकांच्या पगारीमध्ये वाढ नक्कीच करणार, शिक्षकांच्या अडीअडचणी सोडवणार असे प्रतिपादन त्यांनी केले. शिक्षणात आमूलाग्र बदल करण्यासाठी भविष्यात पुढील १२ वर्षांचा मॅप तयार करणे आवश्यक आहे. विद्यार्थी चांगला घडावा यासाठी शिक्षकांचा प्रयत्न असतो. तुमच्या हातून भविष्यात अजूनही चांगले उपक्रम घडावेत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी शिक्षकांकडून व्यक्त केली.
यावेळी बोलताना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले की, गुणवत्ता असलेले शिक्षक हे जिल्हा परिषद शाळेत आहेत हे समाधानाची बाब आहे. शिक्षकांच्या पेन्शनचा प्रश्न महत्वाचा आहे. शिक्षकांच्या पुरस्काराचे कार्यक्रम दरवर्षी व्हायलाच पाहिजे. अशा प्रकारे तीन वर्षाचे पुरस्कार एकदाच देणे योग्य नाही अशी खंत व्यक्त केली. शिक्षण व्यवस्थेकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे असे म्हणत त्यांनी शासनाच्या विविध नवीन योजनांबद्दल शंका व्यक्त केली. या कार्यक्रमात २०२१-२२, २०२२-२३, २०२३-२४ या तीन वर्षांतील एकूण ३५ शिक्षकांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त सुनंदा निर्मळे, रामकृष्ण पाटील व उत्कृष्ट कार्याबद्दल सुप्रिया माळवदकर यंच्यासह अन्य तिघांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुभाष चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन ज्योती पाटील, सोनाली जगताप यांनी तर विश्वजित चंदनशिवे यांनी आभार मानले.
नियोजनाचा अभाव
शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुरस्कार प्राप्त शिक्षक सहकुटुंब आले होते. परंतु सत्कार सुरू असताना मंचाच्या बाजूला गोंधळ सुरू होता. कोण काय बोलतोय हेच कळत नव्हते. तसेच मंचाच्या समोरच पुरस्कार प्राप्त शिक्षकांसोबत फोटो काढण्याची जणू स्पर्धाच सुरू होती. त्यामुळे कार्यक्रमासाठी आलेल्या अनेकांनी नाराजी व्यक्त केली.