प्रतिनिधी / लोहारा
लोहारा तालुक्यात मराठा (Maratha) कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोडी लिपी तज्ञाची नेमणूक करून तहसिल व भूमी अभिलेख कार्यालयातील नोंदींची पडताळणी करण्यात यावी अशी मागणी स्वराज्य पक्षाने सोमवारी (दि.१८) तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रभर मराठा कुणबी असलेल्या नोंदी हजारोंनी सापडत असताना दुसऱ्या बाजूला लोहारा तालुक्यात मात्र नोंदी सापडत नसल्यामुळे गरीब मराठा कुटुंबाला आरक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन स्वराज्य पक्षाच्या वतीने तहसीलदार लोहारा व भूमि अभिलेख कार्यालय लोहारा यांना निवेदन देऊन मराठा कुणबी असल्याचे दाखले व नोंदी शोधण्यासाठी मोडी लिपीतील तज्ञ व्यक्तीची नियुक्ती करून सर्वसामान्य कुटुंबातील मराठा समाजातील व्यक्तीकडे असलेल्या कागदपत्राची ही तपासणी करण्यात यावी अशी मागणी लोहारा तहसीलदार यांच्याकडे स्वराज्य पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी स्वराज्य पक्षाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश गोरे, तालुकाध्यक्ष प्रशांत थोरात, उपाध्यक्ष तानाजी पाटील, संजय मुरटे आदी उपस्थित होते.