लोहारा शहरातील किंग कोब्रा सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना बुधवारी (दि.१०) बक्षीस वितरण करण्यात आले.
लोहारा शहरातील किंग कोब्रा सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सव काळात विविध सामाजिक उपक्रम, स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या मंडळाकडून गणेशोत्सव काळात लोहारा शहरातील हायस्कुल लोहारा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत जवळपास दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पारंपारिक सण, उत्सव असा विषय या चित्रकला स्पर्धेसाठी देण्यात आला होता. या स्पर्धेत लहान गटातून सायली साळुंखे हिने प्रथम, वैभवी नरगाळे द्वितीय तर हुमेरा शेख हिने तृतीय क्रमांक मिळवला. तसेच मोठ्या गटातून स्नेहा फुलसुंदर हिने प्रथम, भावना आपसिंगेकर द्वितीय तर
वैष्णवी नरगाळे या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक मिळवला. स्पर्धेतील विजेत्यांना बुधवारी (दि.१०) बक्षीस वितरण करण्यात आले. विठ्ठल वचने, गोपाळ सुतार यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक दयानंद पोतदार, व्यंकटेश पोतदार, शिदोरे सर यांनी सहकार्य केले. या स्पर्धेसाठी किंग कोब्रा गणेश मंडळाचे शंभुलिंग स्वामी, किरण पाटील, ईश्वर बिराजदार, प्रशांत माळवदकर, सचिन स्वामी यांच्यासह मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले होते.

स्पर्धेत मुलींची बाजी
या स्पर्धेत जवळपास दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात मुले व मुलींचा समावेश होता. परंतु या स्पर्धेतील दोन्ही गटात फक्त मुलींनीच बाजी मारली आहे.








