लोहारा येथे झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण चार विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यानिमित्त खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
या स्पर्धा लोहारा तालुका क्रीडा संयोजन समिती व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि.१२) लोहारा शहरात घेण्यात आल्या. १९ वर्षाखालील ६० किलो वजन गट ग्रिको रोमन कुस्ती प्रकारात प्रवीण पवार प्रथम तर ५५ किलो वजन गटात संघदीप कांबळे प्रथम आला आहे. १९ वर्षाखालील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात सुमित भंडारे प्रथम तर १७ वर्षाखालील नितीन रणखांब हा विद्यार्थी ग्रिको रोमन कुस्ती प्रकारात प्रथम आला आहे. हे सर्व विद्यार्थी लोहारा तालुक्यातुन प्रथम आल्यामुळे त्यांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा धाराशिव येथे होणार आहेत. विजयी खेळाडूंचा सत्कार प्राचार्या उर्मिला पाटील यांनी केला. संस्थेचे सचिव व प्राचार्य डॉ शेषेराव जावळे पाटील यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी क्रीडा विभाग प्रमुख प्रा. प्रशांत काळे, नागनाथ पांढरे, विद्यासागर बुवा, गणेश कांबळे, राजेंद्र साळुंके, अंकुश शिंदे, सचिन शिंदे, राजेश अष्टेकर, दगडू साठे, दत्तात्रय पांचाळ यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच लोहारा तालुका क्रीडा संयोजन समितीचे अध्यक्ष गोपाळ सुतार, सचिव मुकेश सोमवंशी यांनी या खेळाडूंना जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.