लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या चार विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय शालेय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शालेय व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा २०२४-२५ मध्ये उमरगा येथे जिल्हास्तरीय तर धाराशिव येथे विभागीय स्तरावरील स्पर्धा पार पडल्या. या दोन्ही ठिकाणी स्कूलमधील इयत्ता ६ वी वर्गातील साहिल शेख, ७ वीतील साई मानिकवार, ८ वीतील सुदर्शन मोरे व प्रणव अंबर या चार विद्यार्थ्यांनी तेंगसुडो ( कोरियन कराटे) या क्रिडा प्रकारात यशस्वी होवून दि. १० व ११ जानेवारी रोजी धुळे येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय तेंगसुडो ( कोरियन कराटे) या स्पर्धेसाठी पात्र होवून त्यांची निवड झालेली आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुहास भोसले, स्कुलचे प्राचार्य शहाजी जाधव, संचालिका सविता जाधव, मार्गदर्शक शिक्षक महंमदरफी शेख, पालक प्रतिनिधी महेश अंबर, सिद्धेश्वर सूरवसे यांनी अभिनंदन करून स्कूलतर्फे त्यांचा सत्कार केला. तसेच त्यांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी स्कूलमधील सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते.