लोहारा येथील भारतमाता मंदिरात रविवारी (दि.६) प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी लोहारा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा वैशाली खराडे, स्त्रीरोग तज्ञ डॉ. रुपाली श्रीगिरे, नगरसेविका शामल माळी, मंदिर समिती सदस्या विजया पाटील, सुलक्षणा जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शहाजी जाधव यांनी सांगितले की, दरवर्षी भारतमाता मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा होत असतो. त्याचबरोबर श्रीराम नवमी ते हनुमान जयंती दरम्यान बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यात येते. यावेळी सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतमाता व प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन व महाआरती करण्यात आली. त्यानंतर बालसंस्कार शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्षा वैशाली खराडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बालसंस्कार शिबिरातील सहभागी विद्यार्थ्यांना पाटिल मॅडम यांनी मार्गदर्शन केले. यानंतर नगराध्यक्षा वैशाली खराडे व डॉ. रुपाली श्रीगिरे यांनी श्रीराम जन्मोत्सव निमित्त सर्वांना शूभेच्छा दिल्या. श्रीराम जन्मोत्सव सोहळा व बालसंस्कार शिबिर यशस्वी करण्यासाठी जनकल्याण समिती संचलित भारतमाता मंदिर प्रकल्प समितीचे शंकर जाधव, प्राचार्य शहाजी जाधव, शिक्षक दयानंद क्षीरसागर, व्यंकटेश पोतदार, विरेश स्वामी, यशवंत चंदनशिवे, दत्तात्रय पोतदार यांनी योगदान दिले.
