लोहारा तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी (दि.२५) धानुरी येथील आठवडी बाजारास भेट दिली. या स्कुलमधील दुसरी व तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम घेण्यात आला होता.
या बाजारभेट उपक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका हिरा सोलापूरे यांनी केले होते. विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाची माहिती व्हावी व बाहेर समाजामध्ये कशा पद्धतीने बोलले पाहिजे याचे ज्ञान घेता यावे यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या भेटीमधून विद्यार्थ्यांना भाजीपाला कोण व कोठून भाजीपाला आणतात याबद्दल प्रत्यक्षात शेतकरी बांधवांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. भाजीपाला पिकवण्यासाठी लागणारे कष्ट, त्यासाठी लागणारे दिवस

आणि त्यामधून मिळणारा पैसा याबद्दल विद्यार्थ्यांनी जाणून घेतले. हा भाजीपाला पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना अहोरात्र कष्ट करावे लागतात. बऱ्याच वेळेस त्यांचा मोबदला सुद्धा शेतकऱ्यांना मिळत नाही अशी दयनीय अवस्था असून शेतकरी संपूर्ण जग चालवतो. सर्व विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या कथा आणि व्यथा जाणून घेतली. बाजारातील शेतकरी व व्यापारी यांना विद्यार्थ्यांना पाहून त्यांच्यामध्ये ही एक प्रकारचा उत्साह दिसून आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आठवडाभरासाठी लागणारा सर्व भाजीपाला खरेदी केला. या उपक्रमात अश्विनी आळंगे, रोहिणी पाटील, रेवती रणखांब, स्नेहलता गोरे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही या बाजारभेट उपक्रमात सहभाग घेतला होता.















