लोहारा (lohara) तालुक्यातील जेवळी (jewli) येथील ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांच्या (mahatma basaweshwar) जयंतीनिमित्त अक्षयतृतीयापासून (akshay trutiya) तीन दिवस मोठी यात्रा भरते. या यात्रेनिमित्त येथे विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षी ही यात्रा दि. १० ते १२ या कालावधीत पार पडत आहे.
तालुक्यातील जेवळी येथे दरवर्षी या यात्रेचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात येते. आजपासून या यात्रेस सुरुवात होत आहे. यानिमित्त शुक्रवारी (दि.१०) सकाळी ८ वाजता १०१ बैलजोडीची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हास्तरीय पशुप्रदर्शन होणार आहे. त्यानंतर दुपारी एक वाजता कोकण फेस्टिव्हल (kokan festival) कलाकारांचा नाटक व लावणीचा कार्यक्रम होणार आहे. रात्री दहाच्या सुमारास नंदीकोलासह अक्षता सोहळा व अग्नी प्रज्वलन होणार आहे. शनिवारी (दि.११) सकाळी आठ वाजता श्री महात्मा बसवेश्वरांची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता नंदी कोलासह अग्निस्पर्श होणार आहे. दुपारी दोन वाजता गवळण व वाघ्या मुरळीचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर रात्री नंदीकोल, चित्र रथासह छबिना मिरवणूक व शोभेची दारुकाम होणार आहे. रविवारी (दि.१२) दुपारी कुस्त्यांची दंगल होणार आहे.
जेवळी गावातील जे लोक नोकरी, व्यवसाय उद्योगासाठी बाहेरगावी वास्तव्यास आहेत. ते सर्व लोक या यात्रेसाठी हमखास येतात. तसेच परिसरातील अनेक गावातील लोक या यात्रेसाठी येत असतात. या यात्रे दरम्यान आयोजित विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.