लोहारा (Lohara) तालुक्यातील हराळी येथे तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. बुधवारी (दि.१०) या प्रशिक्षणास सुरुवात झाली.
तालुका कृषी अधिकारी कार्यालय लोहारा व कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील हराळी येथील ज्ञान प्रबोधिनी येथे राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीतधान्य विकास कार्यक्रम अंतर्गत सोयाबीन, राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान कडधान्य विकास कार्यक्रम अंतर्गत तूर, उडीद, मुग व राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान भरडधान्य विकास कार्यक्रम अंतर्गत मका पिकाचे शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र येथील शास्त्रज्ञ श्रीकृष्ण झगडे व बी.के. आरबाड, तालुका कृषी अधिकारी महेश देवकाते, कृषी विद्यालय हराळी येथील महेश राजे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना श्रीकृष्ण झगडे यांनी सोयाबीन व तूर पिकाचे लागवड तंत्रज्ञान विषयी मार्गदर्शन केले. तसेच बी. के. आरबाड यांनी मका, उडीद, मूग, हरभरा पिकाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

तालुका कृषी अधिकारी महेश देवकाते यांनी आपल्या प्रास्ताविकपर मार्गदर्शनात शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनेविषयी माहिती दिली. यावेळी कृषी विद्यालय हराळी येथील अवजारे बँकेस भेट देण्यात आली. या कार्यक्रमास तालुक्यातील शेतकरी, महिला शेतकरी, कृषी विद्यालयाचे विद्यार्थी तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालय अधिनस्त एम.एम. माळकुंजे, आर.बी. बनसगोळे, एम.एम. फावडे व सर्व सहाय्यक कृषी अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांचा सन्मान करण्यात आला. शैलेश जट्टे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.







