लोहारा शहरातील ग्रामदैवत शंभो महादेवाच्या महाशिवरात्री (mahashivratri) यात्रा महोत्सवास शुक्रवारी (दि.८) मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यानिमित्त शहरातील जगदंबा (jagdamba) मंदिरातून महादेवाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते आरती करून मोठ्या उत्साहात वाजता गाजत फटाक्यांची आतिषबाजी करून पालखीची व महादेवाच्या मानाच्या काठ्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. सलग चार दिवस चालणाऱ्या यात्रा महोत्सवात सांस्कृतिक, क्रिडा, भारुड, कुस्ती यासह विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या यात्रा महोत्सवाची सुरुवात शोभायात्रेने झाली. यावेळी हरिहर भजनी मंडळाचे वारकरी टाळ, मृदुंग, बेंजो, लेझीम पथकाच्या कडकडाटात हर हर महादेवच्या घोषणा देत पालखी व महादेवाच्या मानाच्या काठ्यांची जगदंबा मंदीर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पालखी व महादेवाच्या काठ्यांचे व शोभायात्रेचे छत्रपती शिवाजी महाराज (chatrapati shivaji maharaj) चौकात आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करून या शोभायात्रेचे मान्यवर व ग्रामस्थांच्या हस्ते महादेवाची आरती करण्यात आली. त्यानंतर ही शोभायात्रा जुन्या गावातील प्राचीन महादेव मंदिरापर्यंत काढण्यात आली. दुपारी १ वाजता भारुडाचा जंगी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी लोहारा (lohara) येथील चालक व मालक संघटनेच्या वतीने उपस्थित भाविकांना फराळ व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महादेव मंदिर येथे सायंकाळी ७ वाजता दिपोत्सव (खास महिलांसाठी ) कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी शहरातील युवक, यात्रा कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लहान मुले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रेनिमित्त महादेव मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. महाशिवरात्री निमित्त शुक्रवारी पहाटेपासूनच महादेव मंदिरात भाविकांनी महादेवाच्या अभिषेक व दर्शनासाठी गर्दी केली होती.
————
सलग ४ दिवस कार्यक्रमाचे आयोजन
या यात्रा महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी पालखी मिरवणूकीने झाली. शनिवारी (दि.९) सकाळी ८ वाजता शिवस्तोत्र पठण स्पर्धा होणार आहे. त्यानंतर ११.३० वाजता शिवभक्त संगमेश्वर बिराजदार महाराज वलांडीकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजता भव्य खुल्या जंगी कुस्त्यांचा फड रंगणार आहे. शेवटची कुस्ती विजेत्या मल्लास ३५ तोळे चांदीची महादेवाची पिंड शिवशंकर जट्टे कुटुंबियांच्या वतीने देण्यात येणार आहे.
उपविजेत्यास लोहारा (खुर्द) येथील नरहरी सुग्रीव रसाळ यांच्या वतीने रु. ५००० व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. तिसऱ्या दिवशी रविवारी (दि.१०) सकाळी ७ वाजता मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता महादेव मंदिरात महिलांसाठी खुल्या रांगोळी स्पर्धा होणार आहे. रात्री ७ वाजता भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. चौथ्या दिवशी सोमवारी (दि.११) रात्री ७ वाजता भव्य खुल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा संपन्न होणार आहेत.
महाशिवरात्री यात्रा महोत्सव व धार्मिक, सांस्कृतिक, क्रिडा स्पर्धा व विविध कार्यक्रमाचा लोहारा तालुक्यासह परिसरातील क्रिडा प्रेमी व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटी व लोहारा शहरवाशीयांच्या वतीने करण्यात आले आहे.