वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्याने मागील आठवड्यात उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार आज ७ ग्रामपंचायतच्या उपसरपंचांची निवड होणार आहे.
तालुक्यातील सास्तुर, जेवळी (उ), माकणी, नागुर, विलासपुर पांढरी, माळेगाव, उंडरगाव, तोरंबा, सालेगाव, हिप्परगा रवा, वडगाववाडी, अचलेर व वडगाव गांजा ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम पार पडला. सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होती. त्यामुळे आता उपसरपंच कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपसरपंच पदासाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्याने काही ठिकाणी मोठा पेच निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे उपसरपंच पदाचा पेच पॅनलप्रमुख कशा पद्धतीने सोडविणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. उपसरपंच निवडीसाठी आज दि. ४ रोजी सालेगाव, वडगाववाडी, माळेगाव, उंडरगाव, सास्तुर, जेवळी व वडगाव गांजा या ७ ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सदस्यांची सभा नेमून दिलेले अध्यासी अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. सकाळी दहा ते दुपारी दोन दरम्यान सरपंचाच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे. त्यामुळे उपसरपंचपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.