वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पिकांचे विमा भरूनही शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळाला नसल्याने तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम जमा करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा लोहारा तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसीलदार मार्फत पंतप्रधान व कृषी मंत्री यांना गुरुवारी (दि. १६) दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनात म्हणले आहे की, तालुक्यात सप्टेंबर व ऑक्टोंबर २०२१ मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानीची टक्केवारी ही कमीत कमी ८० टक्के व त्यापेक्षाही जास्त असताना देखील नुकसानीच्या टक्केवारीच्या तुलनेत पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पीक विमा भरला परंतु अनेक अशिक्षित शेतकऱ्यांनी शेतातील मोक्याच्या ठिकाणी जाऊन अँप द्वारे नुकसान झालेल्या पिकांचे फोटो अपलोड केले नाही तर अनेक अशिक्षित शेतकऱ्यां जवळ मोबाईलच नसल्यामुळे पिकाचे नुकसान होऊन देखील विम्यापासून वंचित राहिले आहेत. तसेच पीकविमा कंपनीने गेल्या वर्षी निकषाचा आधार घेवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली होती. परंतू यावेळी पुन्हा केंद्राच्या चुकीच्या नोटिफिकेशनचा आधार घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे कधीही न भरुन येणारे नुकसान झालेले आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल या आशेपोटी शेतकरी राजा खुश होता. परंतु सुरु केलेली ही प्रधानमंत्री पिकविमा योजना निव्वळ पोकळ ठरली असून पिकविम्याच्या रक्कमेपोटी या योजनेच्या माध्यमातून केवळ पिकविमा कंपनीला पोसण्याचे काम होत असल्याचे दिसून येत आहे.
तरी पिकविम्याची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करण्यात यावी, अन्यथा शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता शेतकऱ्याच्या वतीने संभाजी ब्रिगेडकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असा ईशारा या निवेदनात दिला आहे. या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष धनराज बिराजदार, कार्याध्यक्ष बालाजी यादव, किरण सोनकांबळे, प्रणिल सूर्यवंशी आदींच्या सह्या आहेत.