वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील धानूरी येथे मागील काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने आमदार ज्ञानराज चौगुले यांनी गुरुवारी (दि.१७) धानुरी गावास भेट देऊन तेथील ग्रामस्थांशी संवाद साधून सद्यस्थितीचा आढावा घेतला.
मागील काही दिवसांपासून तालुक्यात अत्यल्प रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे काही प्रमाणात तालुक्याला दिलासा मिळाला होता. बुधवारी आलेल्या अहवालानुसार ती संख्या मोठी असल्याचे दिसून आले. बुधवारी ( दि. १६) प्राप्त अहवालानुसार तालुक्यात रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये ३९ तर आरटीपीसीआर चाचणीमध्ये ६ असे एकूण ४५ जण पॉझिटिव्ह आले होते. विशेष म्हणजे ४५ पैकी ३९ जण धानुरी गावातील होते. तसेच मंगळवारी (दि.१५) धानुरी गावात १४ जण पॉझिटिव्ह निघाले होते. सद्यस्थितीत धानुरी गावातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या जवळपास ९० आहे. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक आहे. तेथील सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी गुरुवारी ( दि. १७) धानुरी गावास भेट दिली. गावातील जास्तीत जास्त नागरिकांच्या चाचण्या करण्यासाठी आरोग्य विभागाच्या ४ स्वतंत्र टीम नियुक्त करून वार्डनिहाय काम करावे, गावातील अवैध धंदे हे कोरोनाचे हॉटस्पॉट झाल्यानेही रुग्णसंख्या वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने अवैध धंदे चालकांवर कठोर कारवाई करावी अशा सूचना आमदार चौगुले यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, विशेषतः लहान बालकांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन केले. तसेच सद्यःस्थितीचा विचार करता येत्या 2 दिवसांत धानुरी गावात ३० बेडचे विलगिकरण कक्ष सुरू करण्याचा निर्णय यावेळी झाला.यावेळी युवा नेते किरण गायकवाड, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संतोष रुईकर, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पनुरे, बाबुराव शहापूरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण, माजी जि. प. सदस्य दीपक जवळगे, प्रा. आनंदराव सूर्यवंशी, सरपंच प्रवीण थोरात, उपसरपंच विठ्ठल बुरटूकणे, ग्रामसेवक जाधव, परमेश्वर साळुंके, संदीपान बनकर आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
————-
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मागील अनेक दिवस शासनाने कडक निर्बंध लावले होते. सध्या त्यात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. परंतु कोरोनाचा संसर्ग अद्याप पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घेणे, स्वतःची व आपल्या कुटुंबाची योग्य ती काळजी घेणे, अनावश्यक घराबाहेर न पडणे, प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
No Result
View All Result
error: Content is protected !!