वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
७५ वा आजादी का अमृत महोत्सव निमित्त आयोजित महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती लोहारा अंतर्गत नवप्रभा महिला प्रभाग संघ जेवळी व किरण महिला प्रभाग संघ माकणी आयोजित पर्यावरण पूरक मकर संक्रांती निमित्ताने बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या अस्सल उत्पादनाची विक्री व प्रदर्शन महोत्सव साजरा करण्यात आला.लोहारा तालुक्यातील जेवळी व माकणी परीसरातील स्वयंसहायता समुह व उत्पादक गटांनी बनवलेल्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने अनेक वस्तू व उत्पादनांची विक्री करण्यासाठी उत्तर जेवळी आठवडी बाजार व माकणी येथे विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी जेवळी येथील प्रदर्शनाचे उद्घाटन लोहारा पंचायत समिती उपसभापती व्यंकट कोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दक्षिण जेवळीचे सरपंच चंद्रकांत साखरे, दत्ता गाडेकर, श्रीशेल भैराप्पा, राम मोरे, प्रविण बोंदाडे, नंदाबाई बोंदाडे, राशीद मुजावर, मल्लीनाथ कोराळे, पि.आर. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक अलंकार बनसोडे व सूत्रसंचालन प्रभाग समन्वयक शिवशंकर कांबळे यांनी केले. प्रभाग कृषी व्यवस्थापक किशोर हुडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभाग समन्वयक अविनाश चव्हाण व नवप्रभा महिला प्रभाग संघातील सर्व समुदाय संसाधन व्यक्ती परिश्रम घेतले. तालुक्यातील माकणी येथील प्रदर्शनाचे उद्घाटन सरपंच विठ्ठल साठे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी विनोद पवार, तालुका समन्वयक नरेंद्र गवळी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माकणी प्रभागातील प्रभाग समन्वयक श्री. अंतेश्र्वर माळी व प्रभागातील सर्व समुदाय संसाधन व्यक्ती यांनी परिश्रम घेतले.