वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तहसील कार्यालयातील सभागृहात आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. ८) आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आ. चौगुले यांनी विविध विभागातील अधिकाऱ्यांना नागरिकांच्या अडचणीसंदर्भात सूचना दिल्या.
लोहारा तहसील कार्यालयात ही बैठक घेण्यात आली. यावेळी तहसीलदार संतोष रुईकर, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी गजानन शिंदे, महावितरणचे एस. जी. रेड्डी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आ. ज्ञानराज चौगुले म्हणाले की, मागील काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच सूर्यप्रकाश नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे सरसकट नुकसानीची पाहणी करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. लवकरात लवकर पाहणी करून पंचनामे सादर करावेत.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून मागणी करणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ऍप द्वारे नुकसानीची तक्रार करावी असे आवाहन केले. यावेळी उपस्थितांनी महावितरण संदर्भात तक्रारी उपस्थित केल्या. सदरील तक्रारी लवकरात लवकर सोडविण्यात याव्यात तसेच शेतकऱ्यांनी रात्री सिंगल फेज लाईट उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करा अशा सूचना यावेळी आ. चौगुले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीत आ. चौगुले यांच्या हस्ते ई पीक पाहणी ऍप संदर्भातील माहितीपत्रकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी मोहन पनुरे, अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब शेख, जगन पाटील, आयुब शेख, राजेंद्र माळी, नगरसेवक अविनाश माळी, जालिंदर कोकणे, दिपक रोडगे, ओम कोरे, संजय ढाकणे, अव्वल कारकून बालाजी चामे, सुरेश दंडगुले परवेज तांबोळी, धानुरीचे उपसरपंच विठ्ठल बुरटूकणे, अंकुश बालकुंदे आदींसह नागरिक उपस्थित होते. आढावा बैठकीनंतर लोहारा नगरपंचायत कार्यालयात आ. ज्ञानराज चौगुले यांचा लोहारा शहरासाठी भरघोस निधी दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
———-
आ. चौगुले यांनी केली नुकसानीची पाहणी
लोहारा येथील आढावा बैठकीपूर्वी आ. चौगुले यांनी अधिकाऱ्यांसोबत तालुक्यातील कोंडजीगड, मुर्षदपूर, सास्तुर येथील शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. उमरगा व लोहारा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करणेबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.