वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मागील अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली लोहारा शहर कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना लवकरच मार्गी लागणार आहे. महाराष्ट्र सुवर्ण नगरोत्थान महाभियान अंतर्गत लोहारा (बु) नगरपंचायत करिता प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेसाठी तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा धरणातून पाणी आरक्षित करण्यात आले असल्याची माहिती आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली आहे.
लोहारा शहरासाठी अद्यापही कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली नाही. त्यामुळे सार्वजनिक विहीर, कूपनिकेच्या माध्यमातून शहरवासीयांना तहान भागवावी लागत आहे. परिणामी उन्हाळ्यात शहरवासीयांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे माकणी धरणातून शहराला कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना राबवावी अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जाते. लोहारा शहरापासून माकणी येथील निम्न तेरणा धरण अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर आहे. परंतु शेजारील निलंगा, औसा, उमरगा या ६० ते ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या शहरांना पाणी आरक्षित करून पाणीपुरवठा केला जातो. मात्र लोहारा शहरासाठी पाणी आरक्षित नसल्याने लोहारा शहरवासीय या योजनेपासून वंचित राहत होते. त्यामुळे शहर कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव पुढे सरकत नव्हता.
अखेर लोहारा (बु) नगरपंचायत प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेकरिता निम्न तेरणा प्रकल्पातून ०.८८३ दलघमी एवढे पाणी आरक्षित करण्यात आले आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता म. र. अवलगावकर यांच्या स्वाक्षरीने दि. १ फेब्रुवारी २०२३ रोजी कार्यालयीन आदेश काढण्यात आला आहे अशी माहिती आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली आहे. त्यामुळे लोहारा शहरवासीयांना प्रतीक्षा असलेली कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना पुढील काही महिन्यात कार्यान्वित होईल अशी आशा आहे.
———-
लोहारा (बु) नगरपंचायत प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेसाठी निम्न तेरणा धरणातून पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे या योजनेच्या कामास गती येणार असून ही योजना लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
– आ. ज्ञानराज चौगुले
—————
पदाधिकाऱ्यांनी केला जल्लोष
लोहारा (बु) नगरपंचायत प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेसाठी निम्न तेरणा धरणातून पाणी आरक्षण मंजूर झाल्याचे समजताच लोहारा नगरपंचायत पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडत जल्लोष केला.