उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व पशुसंर्वधन विभाग जळकोट यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि.3) गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद लातूर सेस फंडातून अनुसूचित जाती संवर्गातील तालुक्यातील 10 बचत गटांना कॅलिफोर्निया पद्धतीच्या कुक्कुटपालन व्यवसाय बाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
या प्रशिक्षणात पशुधन विकास अधिकारी डॉ.शिवराज स्वामी यांनी कॅलिफोर्निया पद्धतीच्या कुक्कुटपालन जागेची निवड, लसीकरण, पाणी,खाद्य व अंडी विक्री व्यवस्थापक याविषी सविस्तर मार्गदर्शन केले.तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सुरेखा नामदार यांनी उपस्थित पशू सखी व महिलाना पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनेविषयी माहिती सांगितली. याप्रसंगी तालुका अभियान व्यवस्थापक भगवान अंकुश यांनी गावातील वंचित घटकांना विकासाच्या
मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरू केलेल्या या योजनेतून महिलांनी पारंपारिक कुक्कुटपालन सोबतच आधुनिक पद्धतीच्या कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करावा व या योजनेची यशस्वी अंमलबजावणी करावी असे प्रास्ताविकातून नमूद केले. प्रशिक्षण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका व्यवस्थापक सामाजिक समावेशन शीतल पुरी यांनी केले. या प्रशिक्षणाचे यशस्वी नियोजन प्रभाग समन्वयक गजेंद्र कलमे, अर्जुन पवार व गजानन श्रीमांगले यांनी केले. या प्रशिक्षणास गटातील महिला व तालुक्यातील पशू सखी उपस्थित होत्या.