वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन सपोनि अमोल पवार, पोलिस नियंत्रण कक्षाचे पोउपनि संदीप ओहोळ यांसह पथक जिल्हातील अवैध धंदयांविषयी माहिती काढुन कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि. 11 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद ते तुळजापूर रस्त्यावर गस्तीस होते. दरम्यान पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, बावी शिवारातील उतमी रस्त्यालगत वाघमारे यांच्या शेतात एका पत्रा शेडमध्ये काही इसम जुगार खेळत आहेत. यावर पथकाने सदर ठिकाणी रात्री दहा च्या सुमारास छापा टाकला असता तेथे राहुल बबनराव भांडवले, शुभम प्रकाश डांगे, जगदीश बबनराव माने, सचिन ज्ञानेश्वर बेंद्रे सर्व रा. गणेशनगर, उस्मानाबाद, बाळासाहेब हरिश्चंद्र गाडेकर, सोमनाथ आप्पाराव दाने, दोघे रा. सांजा, ता. उस्मानाबाद, सचिन हणमंत वाघमारे, रा. समतानगर, उस्मानाबाद, सतीश ज्ञानोबा बन, रा. तेर, ता. उस्मानाबाद, सुरज नागनाथ बनसोडे, रा. काठी, ता. तुळजापूर, अमोल फुलचंद मगर, रा. वाघोली, ता. उस्मानाबाद हे सर्व लोक तिरट नावाचा जुगार खेळताना मिळुन आले. त्यांच्याकडे जुगाराबाबत विचारणा केली असता सदर पत्रा शेडचे मालक वाघमारे हे असून अमोल फुलचंद मगर हे सदर जुगाराचा अड्डा चालवित असल्याचे समजले. नमूद जुगार अड्ड्यावरुन जुगार साहित्यासह 1 कार, 3 मोटारसायकल, 9 मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकुण 8,62,100 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला असुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 4,5 अंतर्गत उस्मानाबाद (ग्रा.) पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल पवार, पोउपनि संदीप ओहोळ, पोलीस अंमलदार माने, भोजगुडे, जमादार यांसह पो.मु. येथील जलद प्रतिसाद पथकाचे 8 जवान यांच्या पथकाने केली आहे.